कोरोना व्हायरसचे बॉलिवूडमधील आणखी एका कलाकारांचा जीव घेतला आहे. मागील वर्षी थिएटर सुरू झाल्यानंतर रिलीज झालेला चित्रपट इंदु की जवानीच्या निर्मात्यांपैकी एक निर्माता रायन स्टीफन यांचे कोरोना व्हायरसमुळे निधन झाले आहे.
एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, इंदु की जवानीचे दिग्दर्शक अबीर सेनगुप्ता यांनी रायन स्टीफन यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रायन काही दिवसांपासून गोव्यात राहत होते आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यांना गोव्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रूग्णालयातच आज त्यांचे निधन झाले आहे. अबीर सेनगुप्ता यांनी सांगितले की, त्यांचे वय जवळपास ५० होते आणि ते खूप हसतमुख व्यक्ती होते.
रायन स्टीफन यांनी करण जोहरच्या प्रोडक्शन हाउससोबत काम केले होते. त्यांनी कियारा आडवाणी आणि आदित्य सील अभिनीत इंदु की जवानी व्यतिरिक्त शॉर्ट फिल्म देवीची देखील निर्मिती केली होती. त्यात त्यांनी काजोलसोबत काम केले होते.
रायन स्टीफन यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील काही सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली आहे, यात मनोज वाजपेयी, वरूण धवन, दीया मिर्झा आणि कियारा आडवाणी यांचा समावेश आहे.
कियारा आडवाणीने रायन स्टीफनला श्रद्धांजली देत लिहिले की, आमचे प्रिय रायन आम्हाला खूप लवकर सोडून गेले. तर मनोज वायपेयीने रायन यांच्या आठवणींना उजाळा देत लिहिले की, आमच्या सर्वांसाठी ही खूप धक्कादायक बातमी आहे. ते एक चांगले व्यक्ती होते. हे खरे असू शकत नाही. मी तुला मिस करेन माझ्या मित्रा.