बाहुबली (Bahubali) सिनेमानंतर प्रदर्शित झालेल्या भारतीय सुपरस्टार प्रभास(Prabhas)चे आतापर्यंतचे तीनही चित्रपट प्रेक्षकांना प्रभावित करण्यात अपयशी ठरले आहेत. बाहुबलीनंतर प्रभासचा साहो, राधे श्याम आणि आता नुकताच प्रदर्शित झालेला आदिपुरुष (Adipurush) या चित्रपटाने प्रेक्षकांची निराशा केली. असे असूनही सुपरस्टार प्रभासचे स्टारडम कमी झालेले नाही. निर्मात्यांनी अभिनेत्याच्या खांद्यावर मोठी पैज लावली आहे. प्रभासच्या 'प्रोजेक्ट के' (Project K) चित्रपटाच्या निर्मात्यांनीही त्याच्या चित्रपटावर पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे.
प्रभासचा के प्रोजेक्ट चित्रपट भव्यदिव्य बनवण्याची तयारी निर्माते-दिग्दर्शक करत आहेत. हा चित्रपट ६०० कोटींच्या बजेटमध्ये बनणार आहे. या चित्रपटाचा निर्मिती खर्च सुमारे ४०० कोटी रुपये आहे. हा एक साय-फाय चित्रपट आहे. ज्याच्या निर्मितीमध्ये निर्माते मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. इतकेच नाही तर यातील स्टारकास्टवर निर्मात्यांनी जवळपास २०० कोटी रुपये खर्च केले आहेत. जी खूप मोठी रक्कम मानली जाते. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी प्रभासला १५० कोटी रुपये मानधन म्हणून दिल्याची माहिती आहे. यासह तो भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता बनला आहे.
'प्रोजेक्ट के'मध्ये कमल हसन यांची एन्ट्री
आता या चित्रपटाशी तामिळ सुपरस्टार कमल हसन यांचे नावही जोडले गेले आहे. या चित्रपटासाठी निर्माते कमल हसन यांना २० कोटी रुपये मानधन देत आहेत. तर, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची फी तमिळ सुपरस्टार कमल हासन यांच्या फीपेक्षा कमी आहे. रिपोर्ट्सनुसार, निर्माते अमिताभ बच्चन यांना सुमारे १० कोटी रुपये मानधन देत आहेत. त्यानंतर नाव येते ते दीपिका पादुकोणचं. तिलादेखील १० कोटी मानधन देण्यात आले आहे. दिशा पाटनीसह इतर कलाकारांनाही जवळपास १० कोटी मानधन दिल्याचे बोलले जात आहे. दिशाच्या मानधनाचा आकडा समजू शकलेला नाही.