आज कर्नाटकातील 'प्रोजेक्ट टायगर'ला ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी भेट दिली. यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी जंगल सफारीचा आनंद घेतला. या दौऱ्यात खास गोष्टीने लक्ष वेधले ते म्हणजे ऑस्कर विजेती डॉक्युमेंटरी 'द एलिफंट व्हिस्परर्स' (The Elephant Whisperers) मधील बोमन आणि बेली या जोडप्याचीही पंतप्रधानांनी भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटरवर या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या जोडप्याने सांभाळ केलेल्या 'रघू' या हत्तीसोबतही पंतप्रधानांचे फोटो आहेत.
तमिळनाडूतील मृदुमलाई जंगलात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सफारीचा आनंद घेतला. याच ठिकाणी थेप्पाकडू हा एलिफंट कॅम्प आहे. या कॅम्पमध्येच माहितीपटाचं शूट झालं आहे. इथे हत्तींचा सांभाळ आणि त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. सध्या इथे २८ हत्ती आहेत. याच ठिकाणी बोमन आणि बेली यांनी हत्तींचा सांभाळ केला आहे आणि त्यांचं हत्तींशी खास नातं जोडलं गेलं आहे. या जोडप्याला भेटून पंतप्रधानांनाही प्रचंड आनंद झाला.
कार्तिकी गोन्सालव्हिस (Kartiki Gonsalves) यांनी माहितीपटाचं दिग्दर्शन केलं आहे तर गुनीत मोंगा (Guneet Monga) यांनी निर्मिती केली आहे. हा माहितीपट बनवण्यास जवळपास ५ वर्षांचा कालावधी लागला. कार्तिकी आणि गुनीत यांच्या कष्टाचं चीज झालं आणि या माहितीपटाला यंदाचा प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्कार मिळाला.