Join us

सोशल मीडियाचा वापर करून स्वत:ला प्रमोट करा- अरमान मलिक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2018 1:37 PM

अबोली कुलकर्णी ‘कर गई चुल’, ‘बोल दो ना जरा’, ‘हुआ हैं आज पहली बार’,‘सब तेरा’,‘वजह तुम हो’ यासारखे अनेक ...

अबोली कुलकर्णी ‘कर गई चुल’, ‘बोल दो ना जरा’, ‘हुआ हैं आज पहली बार’,‘सब तेरा’,‘वजह तुम हो’ यासारखे अनेक सुपरहिट रोमँटिक आणि पार्टी साँग गाणारा बॉलिवूडचा तरूण गायक म्हणजे अरमान मलिक़ अवघा २२ वर्षांचा असतानाच त्याने संपूर्ण युवापिढीला त्याच्या सुमधूर गायनाने अक्षरश: वेडं केलं आहे. गुलशन कुमार आणि टी सीरिज यांच्या निर्मितीखालील आणि भाऊ संगीतकार अमाल मलिक-गायक अरमान मलिक यांचे ‘घर से निकलते ही’ हे गाणे अलीकडेच नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. १९६० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पापा’ चित्रपटातील या गाण्याला त्यांनी यानिमित्ताने नवा जन्मच दिला आहे. या गाण्याचे शूटिंग ग्रीस येथे झाले असून काही दिवसांपूर्वीच हे गाणे यूटयूबवर लाँच करण्यात आले आहे. अल्पावधीतच या गाण्याला ३३ मिलियन लाईक्स मिळाले आहेत. याविषयी आणि आत्तापर्यंतच्या त्याच्या प्रवासाविषयी त्याच्याशी मारलेल्या या गप्पा...* ‘घर से निकलते ही’ या पुन्हा रचलेल्या गाण्याची शूटिंग ग्रीसमध्ये झाली आहे. या अनुभवाविषयी काय सांगशील?-  १९६० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पापा’ या चित्रपटातील ‘घर से निकलते ही’ या गाण्याला आम्ही पुन्हा नव्याने प्रेक्षकांसाठी सादर करत आहोत. ही आयडिया भूषण कुमार यांची आहे. जुन्या गाण्यात ज्याप्रमाणे जुगल हंसराज या चॉकलेट बॉयने अभिनय साकारला होता त्याप्रमाणे या नव्या रूपातील सिंगलमध्ये मी काम करावं अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी मला संपर्क साधला आणि मग ग्रीसमध्ये आम्ही गाण्याचं शूटिंग सुरू केलं. सँटोरिया, मेकॉनिया या ग्रीसमधील ज्ञात जागा असून ‘हार्निया’ या अजूनपर्यंत कुणालाही माहिती नसलेल्या ठिकाणी आम्ही शूटिंग केलं आहे. कुणाल वर्मा यांचे शब्द आणि अमालचं अफलातून संगीत यामुळे त्या गाण्याचा पुन्हा एकदा जन्म झाला आहे, असं मी म्हणेन.* या गाण्याचे माधुर्य कायम ठेवण्यासाठी तू कोणते प्रयत्न केले आहेस?  - काही विशेष प्रयत्न केले नाहीत. पण, ज्या प्रामाणिकपणे मी हे गाणं गायलं आहे. गाण्याचा तो फील घेत मी अ‍ॅक्टिंग देखील केली आहे. माझा हाच साधेपणा आणि निरागसपणा यूटयूबवर फॅन्सना आवडत असल्याचे मला कळते आहे. पण, शूटिंग करताना खूप मजा आली. * तू अ‍ॅज अ व्होकॅलिस्ट म्हणून तुमच्या करिअरची सुरूवात केली होती. मग जिंगल्स, सिंगल्स आणि आता पूर्णपणे प्लेबॅक सिंगिंग काय सांगशील या प्रवासाविषयी? - मी वयाच्या १०व्या वर्षापासून गात आहे. इंडस्ट्रीत मला १२ वर्षे झाली. खूप मोठया लोकांसोबत मी काम केलं आहे. खूप शिकायला मिळालं आहे. माझ्या करिअरच्या सुरूवातीला मी  मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासाठी ‘भूतनाथ’मध्ये गाणी म्हटली. त्यानंतर ‘जय हो’ मध्ये सलमान खान तर आता ‘अक्टुबर’मध्ये वरूण धवनसाठी गाणी म्हटली आहेत. आत्तापर्यंतचा प्रवास खूप चांगला होता. अजूनही मी शिकतो आहे. माझा प्रवास सुरू आहे.* अमाल तुझे एक मोठे भाऊ असण्यासोबतच एक सपोर्ट सिस्टीम पण आहेत. काय सांगाल याविषयी? - खरंच अमाल माझ्यासाठी सपोर्ट सिस्टीम आहे. आम्हा दोघांमध्ये खूप प्रेम आणि विश्वास आहे. ‘आधी प्रेम नंतर काम’ असेच आम्हाला लहानपणापासूनच आमच्या आई-वडिलांनी शिकवले आहे. काळाच्या ओघात काम महत्त्वाचं बनत जातं मात्र, दोघा भावांमधील प्रेम कमी व्हायला नको. हेच तत्त्व आम्ही उराशी बाळगून पुढे जात आहोत. आम्ही भांडतो; पण पुन्हा एकत्र येतो त्यामुळेच तर आमची गाणी एवढी पसंतीस उतरतात.* तुझी संगीतातील प्रेरणास्थान कोण आहे?  - सोनु निगम. त्यांना मी लहानपणापासूनच खूप पसंत करतो. तेच माझे आत्तापर्यंतचे आदर्श राहिलेले आहेत. यापुढेही तेच असतील. त्यांनाच मी फॉलो करत राहणार आहे.* सध्याच्या पिढीच्या संगीताबद्दल काय वाटते? - लवकरच बॉलिवूडचे संगीत बदलणार आहे. पुढच्या तीन ते चार महिन्यांत हा बदल होईल. मला आनंद आहे की, या बदलत्या काळाचा आपण भाग असणार आहोत. * संगीत तुझ्यासाठी काय आहे?- संगीत म्हणजे माझं आयुष्य. माझा श्वास. त्याशिवाय मला बाकी कशातच रस नाही. संगीत आहे म्हणून अरमान मलिक आहे, असं मी म्हणेन.*  तू खूपच गुड लूकिंग आणि हॅण्डसम आहेस. तुला आत्तापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक आॅफर्स आल्या असतील. चित्रपटात काम करण्याचा विचार आला नाही का? - आत्तापर्यंत तरी मी तसा काही विचार केला नाही. पण, आयुष्य मला जशा आॅफर्स देत जाईल तशा मी स्विकारणार आहे. ‘सिंगल्स’ मध्ये तर मी काम करत राहणारच आहे. * संगीत इंडस्ट्रीतील स्ट्रगलर्सना तू कोणता संदेश देशील? - मी युवापिढीला एवढंच सांगेन की, पूर्वी यूट्यूब, फेसबूक अशी सोशल मीडियाची साधनं नव्हती. पण आता ती उपलब्ध झाली आहेत. तुम्ही स्वत:ला योग्यप्रकारे प्रमोट करू शकता. यूट्यूबवर एक व्हिडीओ पोस्ट केला तर तो क्षणार्धात जगभरात वर्ल्डवाईड होऊ शकतो. या सर्व साधनांचा योग्य वापर करा आणि संधींचे सोने करा.  गाणे पाहण्यासाठी येथे क्लिक करा..     https://youtu.be/f1qz8vn3XbY