काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. तब्बल अडीच हजार जवान ड्युटीवर परतत असताना स्फोटकांनी भरलेल्या एका कारने जवानांच्या एका बसला जोरदार धडक दिली. गाडीत तब्बल 350 किलो स्फोटके असल्याने बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या हल्ल्यात राखीव पोलीस दलाचे चाळीस हून अधिक जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने इम्प्लॉईज (FWICE)ने आज (ता.17) फिल्मसिटीतील दुपारी 2 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत चित्रीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कॅण्डल मार्चदेखील काढला जाणार आहे. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने इम्प्लॉईजकडून निर्माते, कलाकार, मजदूर व टेक्निशियन्सना दुपारी 12 वाजता फिल्मसिटी गेटवर जमण्यासाठी सांगितले होते. त्याप्रमाणे मोठ्या संख्येने फिल्मसिटीबाहेर जमले होते. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ कॅण्डल मार्च काढण्यात आला आणि 14 फेब्रुवारी काळा दिवस घोषित करण्यात आला. आज फिल्मसिटीतील काम काज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली की, कोणतेही चित्रीकरण, सेटिंग व पोस्ट प्रोडक्शनचे काम होणार नाही. काश्मीर पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बंद ठेवण्यात आला आहे. दादासाहेब फाळके चित्रपट नगरी गोरेगाव पूर्व येथे आयोजित करण्यात आलेला हा मार्च अध्यक्ष बी.एन. तिवारी, जनरल सेक्रेटरी अशोक दुबे व खजिनदार गंगेश्वरलाल श्रीवास्तव यांनी आयोजित केला आहे. सिने व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर माहिती देत लिहिले की, 24 क्राफ्ट्स संघटनांनी फिल्मसिटीमध्ये दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
Pulwama Attack : फिल्मसिटी बंद, दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ FWICEचा कॅण्डल मार्च
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 2:46 PM