अभिनेत्री रवीना टंडन नेहमीच समाजकार्य करताना पाहायला मिळते. ती विविध समाजसेवा संघटनांसोबत काम करत असते. आता ती पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करण्यासाठी पुढे सरसावली आहे. मुंबईत आयोजित केलेल्या एका सौंदर्य पुरस्कार सोहळ्यात ती सहभागी झाली होती. त्यावेळी ती बोलत होती.
रवीना टंडनने सांगितले की, हीच ती वेळ आहे जेव्हा सर्वांनी पुढाकार घेत ते जी काही मदत करू शकतात ती केली पाहिजे. त्यामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांना थोडाफार सहकार्य होईल. मी शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. ही मदत फक्त मुलींपुरती मर्यादीत नाही.तर रवीनाने आयएएनएससोबत केलेल्या बातचीतमध्ये सांगितले की, मी शहीद जवानांच्या फक्त मुलींच्याच नाही तर मुलांच्या शिक्षणाचीदेखील जबाबदारी घेणार आहे. आमचे फाउंडेशन एज्युकेशन त्यांची मदत करणार व सोबतच त्यांना स्कॉलरशीपदेखील देणार आहे.
काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात राखीव पोलीस दलाचे चाळीस हून अधिक जवान शहीद झाले. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यासोबत अनेक जण शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.