Join us

Pulwama Attack: विकी कौशल पुलवामा दहशतवादी हल्ल्याविषयी म्हणाला, हीच खरी वेळ... सडेतोड उत्तर देण्याची

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 1:43 PM

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल याने पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे.

काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला. तब्बल अडीच हजार जवान ड्युटीवर परतत असताना स्फोटकांनी भरलेल्या एका कारने जवानांच्या एका बसला जोरदार धडक दिली. गाडीत तब्बल 350 किलो स्फोटके असल्याने बसला धडक देताच मोठा स्फोट झाला. त्याची तीव्रता इतकी जास्त होती की, त्याचा आवाज 2 ते 3 किलोमीटरपर्यंत ऐकू आला. या हल्ल्यात राखीव पोलीस दलाचे चाळीस हून अधिक जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्याचा बॉलिवूड अभिनेता विकी कौशल यानेही निषेध केला असून त्याने या प्रकरणी त्याचे मत व्यक्त केले आहे.विकी कौशल म्हणाला की, पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात आपण आपल्या बांधवांना गमावले आहे. त्यांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी आता भरुन निघणे शक्य नाही. देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांच्या मृत्यूनंतर माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तींना गमावल्याचे दु:ख मला जाणवते आहे. आयुष्यात निर्माण झालेली ही पोकळी आता भरुन निघणे शक्य नाही. मात्र या शहीदांसाठी, त्यांच्या कुटुंबियांसाठी आपल्या सगळ्यांना एकत्र येण्याची गरज आहे. देशातील साऱ्या जनतेने आता एकत्र येऊन शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी काही तरी करायला हवे. त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करायला हवा.

तसेच तो पुढे म्हणाला की, दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्लानंतर आता शांत बसण्यात अर्थ नाही. त्यांच्या या हल्ल्याला आपण जशास तसे उत्तर द्यायला हवे. त्यांना सडेतोड उत्तर देण्याची हीच खरी वेळ आहे. दरम्यान, विकी कौशलप्रमाणेच अनेक बॉलिवूड कलाकारांनी या हल्ल्याच्या निषेधार्थ त्यांचे मत व्यक्त केले आहे. विकीचा ‘उरी : द सर्जिकल स्टाइक’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याला भारतीय जवानांचे आयुष्य जगण्याची संधी मिळाली. त्यामुळेच पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर तो प्रचंड भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

टॅग्स :विकी कौशलपुलवामा दहशतवादी हल्लाउरी