Join us

​पंजाबी अभिनेता-संगीतकार राज ब्रारचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2017 10:58 AM

पंजाबी चित्रपट व संगीतविश्वासाठी गत वर्षाचा शेवट गोड झाला नाही. प्रसिद्ध अभिनेता आणि संगीत दिग्दर्शक राज ब्रार यांचे ३१ ...

पंजाबी चित्रपट व संगीतविश्वासाठी गत वर्षाचा शेवट गोड झाला नाही. प्रसिद्ध अभिनेता आणि संगीत दिग्दर्शक राज ब्रार यांचे ३१ डिसेंबर रोजी निधन झाले. दारूचे व्यसन आणि यकृतामध्ये बिघाड झाल्यामुळे गेले अनेक दिवस त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू होते; परंतु प्रकृती अत्यंत खालावल्याने त्याने काल वयाच्या ४४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.गेली २५ वर्षे तो संगीत क्षेत्रात कार्यरत होता. १९९२ साली त्याच्या करिअरला सुरूवात झाली होती. अनेक चित्रपट आणि म्युझिक अल्मबसाठी त्याने संगीत दिले. यो यो हनी सिंगला ‘चंदिगड दे नजारियां ने पट्टिया’ या गाण्याद्वारे त्याने संधी दिली होती. २००८ साली आलेला त्याचा ‘रिबर्थ’ नावाचा अल्बम प्रचंड गाजला होता.पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील मल्के नावाच्या छोट्याशा गावात राजचा जन्म झाला होता. लहानपणापासून त्याला गाणे लिहिण्याची आवड होती. स्वत:च्या लिहिलेल्या गाण्यांना चाली बसण्याचा तर त्याला छंदच होता. याच छंदामुळे तो पुढे प्रसिद्धीच्या झोतात आला.रेकॉर्ड कंपनीचा मालक असलेल्या राजने अभिनयाच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले. पंजाबी चित्रपट ‘जवानी जिंदाबाद’द्वारे त्याने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने ‘पोलीस इन पॉलीवूड’ या सिनेमातही काम केले.राज ब्रारचे वैशिष्ट्ये म्हणजे हरभजन मन, लभ जंझुआ, सुरजित बिंद्राखिया, सतविंदर बिट्टी, कुलदीप मानक, मुहम्मद सादिक, अम्रिंदर गिल, शार्दुल सिकंदर, हंस राज हंस, गिल हरदीप यासारख्या एक डझनहून अधिक गायकांना संधी देऊन त्याने पुढे आणले. आज ते कलाकार मोठे संगीतकार-गायक म्हणून आपल्याला परिचित आहे. शिवाय अनेक गीतकारांनासुद्धा ब्रेक देण्याचे काम त्याने केले. यामध्ये बिंदे शहा, लखविंदर मन, गुरूविंदर ब्रार, जर्नेल चक हाजीपूरी आणि कुलदीप मल्के यांची नावे आवर्जुन घ्यावी लगतील.राजच्या तिसऱ्या चित्रपटाची शूटींग लवकरच सुरू होणार होती. परंतु त्यापूर्वीच तो हे जग सोडून गेला. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.