Join us  

एका मुलीमुळे 'या' लोकप्रिय गायकाने वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी सोडलं होतं घर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 11:58 AM

'या' लोकप्रिय गायकाने वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी सोडलं होतं घर

सध्या एका गायकाची सगळीकडे चर्चा सुरू आहे. हा गायक अभिनेतादेखील आहे. नुकतेच त्याच्या एका चित्रपटाने मोठी कमाईदेखील केली.  विशेष म्हणजे या चित्रपटात त्याने गायलेल्या गाण्यांनी तर धुमाकूळच घातला.  बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत सर्वांना त्याने आपल्या गायकी आणि अभिनयाचे वेड लावलं आहे.  तो सुप्रसिद्ध गायक आणि अभिनेता म्हणजे दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh). कितीही लोकप्रिय असला तरी दिलजीत आपलं खाजगी आयुष्य कायमचं लाइमलाइटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण, सध्या त्याच्या बालपणीचा एक किस्सा चर्चिला जात आहे. 

दिलजीत हा वयाच्या आठव्या वर्षीचं शाळेत एका मुलीच्या प्रेमात पडला होता आणि त्याने तिला प्रपोजही केलं होतं. पण, त्यानंतर तो थेट घर सोडून पळून गेला होता. तर तो किस्सा काय आहे, हे आपण जाणून घेऊया.  राज शामानीला दिलेल्या मुलाखतीत दिलजीतने सांगितलं होतं की, 'जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा माझे सिनिअर्स मला विचारायचे की तुला कोणती मुलगी आवडते. तेव्हा मी एका मुलीकडे बोट दाखवतं ती आवडत असल्याचं सांगितलं. यावर त्यांनी मला तिला प्रपोज करण्याचा सल्ला दिला. यावर मीही तिच्याकडे गेलो आणि तिला म्हणालो की आपण दोघं लग्न करू'.

दिलजीतने सांगितले की, 'मी हे बोलताच ती लगेच रागावली आणि शिक्षिकेकडे गेली. शिक्षकांनी मला बोलावलं आणि माझ्या पालकांना दुसऱ्या दिवशी शाळेत घेऊन यायला सांगितलं. तो दिवस माझ्यासाठी जगाचा अंत होता. त्यानंतर मी माझ्या घरी गेलो, फ्रिज उघडलं आणि  काही फळ घेतली. ती माझ्या सायकलमध्ये ठेवली. माझ्या सायकलवरून गावातून पळ काढला. मी घरापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर गेलो होतो, तेव्हा एका गावकऱ्याने मला ओळखले आणि घरी परत जाण्यास सांगितलं. त्याचा ओरडा खाल्ल्यानंतर मी घरी आलो आणि मग दुसऱ्या दिवशी पोटात दुखतंय असं खोटं सांगून शाळेला दोन दिवस दांडी मारली. मग माझ्या शिक्षकांनीही तो विषय सोडून दिला'.

दिलजीतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो अलिकडेच 'अमर सिंग चमकिला' या चित्रपटात अभिनेत्री परिणीत चोप्रासह झळकला होता. . पंजाबी गायक अमर सिंह चमकीला यांच्या जीवनावर सिनेमा आधारित आहे. तर अभिनेत्याचा 'जट्ट अँड ज्युलिएट-३' हा पंजाबी चित्रपट 28 जून रोजी प्रदर्शित झाला. यासोबतच तो अभिनेत्री करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सनॉन यांच्या 'क्रू' चित्रपटातही झळकला होता. या चित्रपटात तो जयसिंग राठौरच्या भूमिकेत दिसला. 

टॅग्स :दिलजीत दोसांझसेलिब्रिटीबॉलिवूडपंजाब