Amar Singh Chamkila: पंजाबी गाण्यातील सुपरस्टार अमर सिंग 'चमकिला' यांची 35 वर्षांपूर्वी हत्या झाली होती. लाईव्ह शोदरम्यान, चाहत्यांसमोर, अमरसिंग आणि त्यांच्या पत्नीवर अंदाधुंद गोळीबार झाला होता. त्या घटनेत पती-पत्नीसह इतर दोघांचा मृत्यू झाला. इतके वर्षे होऊनही त्या घटनेतील आरोपीचा शोध लागलेला नाही. आता त्यांच्या आयुष्यावर एक चित्रपट येतोय. त्यातून अमरसिंग चमकिलाची गोष्ट जगाला कळणार आहे.
कोण होते अमरसिंग चमकिला?80 च्या दशकात चमकिला पंजाबी तरुणांच्या मनावर राज्य करायचा. अमरसिंगचे खरे नाव धानी राम होते, पण तो अमरसिंग चमकिला नावाने ओळखला जायचा. त्यांचा जन्म 21 जुलै 1960 रोजी झाला. बालपण लुधियानाच्या डुगरीमध्ये आणि तरुणपण संपूर्ण पंजाबमध्ये गेले. अमर सिंगला लहानपणापासूनच संगीताची आवड होती. कापड गिरणीत काम करत असताना अमर सिंग यांनी गाणी लिहायला सुरुवात केली. अमर सिंगने 18 व्या वर्षी गायक सुरिंदर शिंदा यांच्यासाठी गाणी लिहायला सुरुवात केली. पण काही काळानंतर घरचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी गायलाही सुरुवात केली. हळूहळू पंजाबी गायनात चमकिला खूप लोकप्रिय झाले.
लोकांना चमकिलांच्या गाण्यांची चटक लागली. दैनंदिन जीवनातील संवाद, ते आपल्या गाण्यात आणायचे आणि लोकांनाही ते आवडायचे. त्यांच्या गाण्यांमध्ये सामाजिक समस्यांना लक्ष्य केले जायचे. त्यांनी स्टुडिओमध्ये बरेच रेकॉर्डिंग केले, परंतु त्यांचे मन चाहत्यांसमोर स्टेजवरच रमले. त्यांचा कार्यक्रमात हजारोच्या सख्येने लोक यायचे. लहान मुलांपासून म्हाताऱ्यापर्यंत, अनेकांना अमरसिंगने वेड लावलं होतं. दुर्दैवी म्हणजे, वयाच्या 27 व्या वर्षीच भारताने हा स्टार पंजाबी सिंगर गमावला. लाईव्ह शोमध्ये चमकिलासह त्याच्या पत्नीवर गोळीबार करण्यात आला. चमकिलाच्या मृत्यूमागे खलिस्तान, ऑनर किलिंग, म्युझिक इंडस्ट्रीतील प्रतिस्पर्धा, अशा वेगवेगळ्या अँगलने तपास झाला. पण, 35 वर्षे होऊनही त्याच्यावर हल्ला करणाऱ्यांचा शोध लागला नाही. आता अमरसिंगच्या आयुष्यावर चित्रपट येतोय.
साडेतीन दशकांनंतर अमिरसिंग चमकिला पुन्हा चाहत्यांसमोर येणार आहे. दिग्दर्शक इम्तियाज अली चमकिलाच्या जीवनावर चित्रपट बनवत आहे. 'अमर सिंग चमकिला' नावाचा चित्रपट नेटफ्लिक्सवर येणार असून, नुकताच चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. अभिनेता सिंगर दिलजीत दोसांझ चमकीलाच्या भूमिकेत असून त्याच्यासोबत परिणीती चोप्रा आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाचे संगीत एआर रेहमान यांनी केले आहे. चित्रपटातून चमकिलाचे आयुष्य लोकांसमोर येणार आहे.