‘काला चष्मा’ गाणे पंजाबच्या पोलिसाचे, मिळाले फक्त ११ हजार !!!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2016 11:13 AM
‘कॅटरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यावर चित्रीत ‘काला चष्मा’ हे गाणे सध्या सर्वच वयोगटातील रसिकांना ठेका धरायला लावत आहे. ...
‘कॅटरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यावर चित्रीत ‘काला चष्मा’ हे गाणे सध्या सर्वच वयोगटातील रसिकांना ठेका धरायला लावत आहे. सर्वांच्याच मोबाइल फोनमध्ये ऐकायला मिळत आहे. या गाण्याचे बोल पंजाबच्या पोलिस दलातील एका कॉन्स्टेबलने लिहिले आहे. मात्र या गाण्याच्या बाबतीत फसवणूक होऊन ११ हजार मिळाल्याची खंत या पोलिसाने व्यक्त केली आहे. पंजाबच्या पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका कॉन्स्टेबलच्या लेखणीतून हे गाणं उतरलं आहे. अमरिक सिंग शेरा असं या ४३ वर्षीय गीतकाराचं नाव आहे. विशेष म्हणजे शेरा यांनी हे गाणं ९० च्या दशकात लिहिलं होतं. जालंधर मधील एका रेकॉर्डींग कंपनीने अमरिक यांना त्यांच्या इतर गाण्यांबाबत विचारणा केली होती असा दावा त्यांनी केला आहे. ‘मला असे सांगण्यात आले होते की, एका सिमेंट कंपनीला त्यांच्या उद्धाटनासाठी माझे गाणे वाजवायचे होते’, त्यासाठी अमरिक यांनी करारावर स्वाक्षरी करुन त्यांना या गाण्यासाठी ११ हजार रुपये मिळाले होते असे सांगत अमरिक यांनी त्या सिमेंट कंपनीचे नाव लक्षात नसल्याचे सांगितले आहे. पण हे गाणे ‘बार बार देखो’ या चित्रपटात दाखविण्यात येत आहे याबद्दल मला कोणीही काहीच सांगितले नव्हते असेही अमरिक म्हणाले आहेत.‘काला चष्मा’ हे गाणे इतके गाजत असले तरीही त्याचे श्रेय न मिळाल्याबद्दल मला फारसे वाईट वाटलेले नाही, असेही अमरिक म्हणाले आहेत. 'हिंदी चित्रपटसृष्टीतून मला या चित्रपटप्रदर्शनासाठी कोणतेही आमंत्रण दिलेले नव्हते. ‘मला फक्त शहरात जाऊन हे गाणे मी लिहिले आहे हे इतरांना सांगायचे आहे’ अशी इच्छा अमरिक यांनी व्यक्त केली आहे.