हैदराबादमधील संध्या थिएटर चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत रेवती या महिलेला आपला जीव गमवावा लागला. यासाठी अल्लू अर्जुनसह अनेकांना जबाबदार धरण्यात आलं आहे. आज सकाळी अल्लू अर्जुनला चिक्कडपल्ली पोलिसांनी अटक केली आणि चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेलं. यानंतर अभिनेत्याला कोर्टात हजर करण्यात आलं. जिथे त्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. याच दरम्यान आता मृत्यू झालेल्या माहिलेचा पती भास्कर याने प्रतिक्रिया दिली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर भास्कर याने मीडियासमोर आपलं मत मांडलं आहे. भास्कर म्हणाला, अल्लू अर्जुनच्या अटक झाली याबाबत मला माहिती नव्हती. त्याचा या संपूर्ण प्रकरणाशी काहीही संबंध नाही. त्याची काहीच चूक नाही. तिथे झालेल्या चेंगराचेंगरीमुळे माझ्या पत्नीचा मृत्यू झाला. पोलिसांनी मला या अटकेबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. भास्करच्या या वक्तव्यावरून या संपूर्ण प्रकरणात नवा ट्विस्ट येणार असल्याचं दिसतं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुनने त्याच्या अटकेच्या पद्धतीवर आक्षेप घेतला होता. पोलिसांनी त्याला नाश्ता पूर्ण करू दिला नाही, असा दावा त्याने केला. पोलिसांनी त्याला थेट त्याच्या बेडरूममधून उचललं होतं, असंही अभिनेत्याचं म्हणणं आहे. त्याला कपडे बदलण्याची संधीही देण्यात आली नाही. मात्र, एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये अभिनेता लिफ्टमध्ये जाताना दिसत आहे.
अल्लू अर्जुन ४ डिसेंबरला हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये पोहोचला. तो तिथे पोहोचताच त्याला भेटण्यासाठी चाहत्यांची गर्दी झाली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत रेवती या महिलेला आपला जीव गमवावा लागला. अल्लू तिथून निघून थेट घरी पोहोचला. दुसऱ्या दिवशी सकाळी अल्लूच्या मॅनेजरने त्याला संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर अभिनेत्याने त्या कुटुंबाला भेटणार असल्याचं सांगितलं. आम्ही २५ लाख रुपये देऊन मदत करू असंही म्हटलं. मात्र आता या प्रकरणी अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे.