पुष्पा द राईज (Pushpa) हा सिनेमा गेल्या 17 डिसेंबरला रिलीज झाला. पण अद्यापही या सिनेमाची क्रेझ कमी झालेली नाही. अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) या सिनेमानं जणू लोकांना वेड लावलं आहे. अख्ख्या सिनेमाभर त्याचं ते खांदा वाकवून चालणं, पाय घसरत घसरत केलेला ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स, दाढीवरून हात फिरवत केलेली डायलॉगबाजी सगळंच एकदम भन्नाट.
हिंदीत डब झालेल्या या सिनेमातील अल्लू अर्जुनची डायलॉगबाजी तर विचारू नका. हिंदीत डब झालेल्या ‘पुष्पा’ला मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) यानं आवाज दिला आहे. त्याचा आवाज अल्लू अर्जुनच्या पात्रासाठी इतका फिट झाला की, अनेकांनी श्रेयसचं भरभरून कौतुक केलं. अगदी श्रेयसच्या दमदार आवाजामुळेच पुष्पा चित्रपट हिंदी मध्ये गाजला असंही म्हटलं गेलं. पण ‘पुष्पा’ गाजण्यामागे केवळ एकट्या श्रेयसचा आवाज नव्हता तर आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याचाही आवाज आहे.
होय, चित्रपटात मंगलम श्रीनूची (Mangalam Srinu) दमदार भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला एका मराठी अभिनेत्यानं आवाज दिलाये. श्रीनूची भूमिका साऊथ स्टार सुनीलने साकारली आहे. या भूमिकेला मराठमोळे अभिनेते उदय सबनीस (Uday Sabnis) यांनी आवाज दिलाये.
उदय सबनीस हे अभिनयासोबतच दिग्गज डबिंग आर्टिस्ट म्हणून ओळखले जातात. याआधी अनेक चित्रपटांना त्यांनी आवाज दिला आहे. काही प्रसिद्ध कार्टून कॅरेक्टर्ससोबत सुमारे हजार हुन अधिक कॅरॅक्टर्सना त्यांनी आपल्या आवाज दिला. उदय सबनीस यांनी अनेक मराठी व हिंदी सिनेमांमध्ये काम केलंय. छोट्या पडद्यावरच्या अनेक मालिकांमध्येही त्यांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.