Join us

Rocketry साठी आर माधवननं राहतं घर विकलं?; बॉलिवूड अभिनेत्याचं चाहत्याला भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 4:36 PM

भारतीय वैज्ञानिक आणि एअरस्पेस इंजिनिअर नम्बी नारायणन यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या रॉकेट्री: द नम्बी इफेक्ट’(Rocketry: The Nambi Effect) हा चित्रपट सर्वांच्या पसंतीत उतरला.

भारतीय वैज्ञानिक आणि एअरस्पेस इंजिनिअर नम्बी नारायणन यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या रॉकेट्री: द नम्बी इफेक्ट’(Rocketry: The Nambi Effect) हा चित्रपट सर्वांच्या पसंतीत उतरला. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे अनेकांनी कौतुक केले. बॉलिवूड अभिनेता आर माधवन (R Madhavan) याने दिग्दर्शित केलेला हा पहिला सिनेमा आहे. ‘रॉकेट्री: द नम्बी इफेक्ट’ सिनेमाच्या  घोषणेपासूनच त्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या वर्षाच्या सुरुवातीला कान्स चित्रपट महोत्सवात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या चित्रपटासाठी आर माधवनने राहतं घर विकल्याची फेसबूक पोस्ट करून चाहत्याने बॉलिवूड अभिनेत्याचं भरभरून कौतुक केलं. त्यावर माधवनने भन्नाट उत्तर दिले.  

‘रॉकेट्री: द नम्बी इफेक्ट’ चित्रपटात माधवन डॉक्टर नम्बी नारायणन यांच्या भूमिकेत दिसला. हा चित्रपट भारतीय वैज्ञानिक आणि एअरस्पेस इंजिनिअर नम्बी नारायणन यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यांना खऱ्या आयुष्यात गुप्तहेरीच्या खोट्या केसमध्ये फसवण्यात आले होते. न्यायालयीन लढा बरीच वर्ष लढल्यानंतर नम्बी यांच्यावरील केसमध्ये काहीच तथ्य नसल्याचे समोर आले. त्यांच्या या जीवनावर आधारित चित्रपटात आर माधवनने चोख भूमिका बजावली.  

एका फॅनने फेसबूक पोस्ट लिहून आर माधवनचे कौतुक केले. त्याने लिहिले की, रॉकेट्रीसाठी आर माधवनने राहतं घर विकलं. इतकंच नव्हे, तर दिग्दर्शकाने त्याच्या आधीच्या कमिटमेंटमुळे हा चित्रपट अर्ध्यावर सोडल्यानंतर आर माधवनने स्वतः दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. दुसरीकडे त्याचा मुलगा वेदांत जलतरणात देशाला पदक जिंकून देतोय. मॅडी तुला सलाम!

माधवनने ती पोस्ट ट्विटरवर शेअर करून लिहिले की, अरे यार. कृपया माझ्या बलिदानाचे जास्त समर्थन करू नका. मी माझे घर किंवा काहीही गमावले नाही. खरं तर रॉकेट्रीमध्ये सामील असलेले सर्वजण या वर्षी अतिशय अभिमानाने मोठा आयकर भरणार आहेत. देवाच्या कृपेने आम्ही सर्वांनी खूप चांगला आणि अभिमानास्पद नफा कमावला. मी अजूनही माझ्या घरात प्रेम करतो आणि राहतो.  

टॅग्स :आर.माधवनरॉकेट्री : द नंबी इफेक्ट