बाबा का ढाबासाठी अजूनही लोकांचे मदत कार्य सुरूच आहे. मात्र आता बाबा का ढाबा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपासून याविषयी काही वाद पुढे येत आहेत. नुकताच बाबा का ढाबाचे मालक कांता दास यांनी त्यांना प्रसिद्धी मिळवून देणारा युट्युबर गौरव वासन विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.ढाब्याच्या नावावर पैशांची अफरातफर केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
कांता प्रसाद यांच्या मदतीसाठी आलेल्या पैशांमध्ये अफरातफर केली गेली असल्याचं म्हटलं जात आहे. गौरव वासन याने सर्वप्रथम या बाबांचा व्हिडीओ तयार केला होता. त्यानंतर बाबा का ढाबा प्रचंड लोकप्रिय झाला आणि लोकांनी वृद्ध दाम्पत्याला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला.
गौरव वासनने बाबा का ढाबाच्या मदतीसाठी ऑनलाईन कॅम्पेन चालवून पैसे गोळा केले पण सर्व पैसे कांता प्रसाद यांना दिलेच नाही. हे पैसै गौरव वासन आणि त्याच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात जमा होत होते अशी माहिती आता समोर आली आहे. त्यानंतर आता कांता प्रसाद यांनी यूट्यूबर गौरव वासनविरोधात मालवीयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी देखील तक्रार मिळाली असून याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचं म्हटलं जात आहे.
ही बातमी आल्यानंतर याचीही तुफान चर्चा होत आहे. यावर अभिनेता आर.माधवननेही ट्विट करत आपले मत मांडले आहे. अशा गोष्टी लोकांना चांगले काम करण्यास रोखतात. त्यामुळे लवकरात लवकरच या प्रकरणात पोलिसांनी चौकशी करावी. सत्य समोर आल्यानंतर गुन्हेगाराला योग्य शिक्षाही द्यावी. दिल्ली पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे.
सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रेटींपर्यंत बाबा का ढाबा प्रचलित आहे. अभिनेत्री रविना टंडननेही व्हिडीओ शेअर करत, 'बाबा का ढाबा'ला एकदा तरी भेट देण्याचे आवाहन केले होते. रवीनाप्रमाणे सोनम कपूर, स्वरा भास्कर, सुनील शेट्टी हे कलाकारदेखील 'बाबा का ढाबा'च्या मदतीसाठी पुढे आले होते. सोशल मीडियावर त्यांनीही हा व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांसह शेअर करत इतरांनाही मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते.