अभिनेता आर. माधवनचा 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) भूतपूर्व शास्त्रज्ञ एस. नंबी नारायणन यांच्यावर हा चित्रपट भाष्य करतो. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू आहे. मात्र आता आर. माधवन या सिनेमाचे दिग्दर्शन करत असल्याचे समजते आहे.
आर. माधवनने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत आर. माधवन चित्रपटाची पाटी आहे ज्यात दिग्दर्शक म्हणून आर. माधवनचे नाव दिसत आहे. इतकेच नाही तर त्याने चाहत्यांकडे तुमचे आशीर्वाद व प्रेमाची गरज असल्याचे म्हटले आहे.
यापू्र्वी या सिनेमाचे दिग्दर्शन अनंत महादेवन करत होते. मात्र त्यांच्या इतर कमिटमेंटमुळे त्यांना हा प्रोजेक्ट सोडावा लागल्याचे सूत्रांकडून समजते आहे. द इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार आर. माधवनने सांगितले की, अनंत महादेवन खूप चांगले दिग्दर्शक आहेत. काही अपरिहार्य कारणे व कमिटमेंटमुळे त्यांना 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' सिनेमा सोडावा लागला. हा चित्रपट विविध कारणांमुळे माझ्या खूप जवळचा आहे. नंबी नारायणन यांची कथा संपूर्ण जगाला सांगण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.नंबी नारायणन हे इस्रोमधील एक शास्त्रज्ञ असून त्यांना १९९४मध्ये हेरगिरी प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. नंबी नारायणन यांनी भारताच्या अंतराळ कार्यक्रमाबाबतचा गोपनीय दस्तऐवज परकीयांच्या स्वाधीन केल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' चित्रपट तमीळ, तेलगू, हिंदी व इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. नंबी यांचा प्रवास रुपेरी पडद्यावर पाहणे व या भूमिकेत आर. माधवनला पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.