Join us  

डाएट नाही, वर्कआऊट नाही तरीही माधवनने त्याचं वजन कमी कसं केलं? सांगितला फिटनेस फंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 2:05 PM

आर.माधवनने त्याचं वाढलेलं वजन कमी करण्याचा फिटनेस फंडा सर्वांसोबत शेअर केलाय (r madhavan)

आर.माधवन हा बॉलिवूडमधला लोकप्रिय अभिनेता. माधवनचे सिनेमे हे आशयघन असतात शिवाय मनोरंजनात्मक असतात. माधवन प्रत्येक सिनेमात वेगवेगळ्या भूमिका करुन प्रेक्षकांना कायमच एक सुखद धक्का देत असतो. माधवनचा काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या 'शैतान' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. माधवन व्ययक्तिक आयुष्यात त्याच्या फिटनेसकडे पण चांगलं लक्ष देतो. एका मुलाखतीत माधवनने त्याचं वाढलेलं वजन कसं घटवलं यासाठी फिटनेस फंडा सांगितलाय. जो सर्वसामान्य माणसांनाही सहज फॉलो करता येईल असा आहे. 

असा आहे आर.माधवनचा फिटनेस मंत्रा

माधवनने 'कर्ली टेल्स' फेम काम्या जानीला दिलेल्या मुलाखतीत त्याचा फिटनेस फंडा सांगितलाय. माधवन म्हणाला, "अधूनमधून उपवास करणं आणि जास्तीत जास्त द्रव पदार्थांवर भर देणं हे माझं रुटीन आहे. याशिवाय संध्याकाळी ६.४५ नंतर काहीही खाणं मी कटाक्षाने टाळतो. एक घास ४५ ते ६० वेळा चावणं आणि पदार्थ खाताना आवश्यक तितकं पाणी पिणं यावर माझा भर असतो. 

माधवन पुढे म्हणाला, "सकाळी लवकर उठून चालणं, लवकर झोपणं. झोपण्याआधी ९० मिनिटं मोबाईल अथवा टीव्ही न बघायचं मी ठरवलंय. जास्तीत जास्त द्रवपदार्थ, हिरव्या पालेभाज्या खाणं. याशिवाय माझ्या शरीराला चांगले असणारे पदार्थ खाण्यावर माझा भर असतो. कोणताही वर्कआऊट नाही, डाएट नाही. त्यामुळे मी २१ दिवसात पुन्हा फिट अँड फाईन झालोय." असं आर.माधवन म्हणाला. माधवनने 'रॉकेट्री' मधील भूमिकेसाठी वजन वाढवलं होतं. परंतु सिनेमाचं शूटींग झाल्यावर माधवनने योग्य आहार घेऊन २१ दिवसात वजन कमी केलं. माधवनने सांगितलेला हा फिटनेस फंडा सर्वजण फॉलो करतील इतका सोपा आहे.

टॅग्स :आर.माधवनफिटनेस टिप्सबॉलिवूड