Join us  

​शाहरुख खानच्या या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आर माधवन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2018 11:47 AM

आर माधवनने त्याच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. आजवर त्याने रहना है तेरे दिल मैं, रंग ...

आर माधवनने त्याच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. आजवर त्याने रहना है तेरे दिल मैं, रंग दे बसंती, थ्री इडियट्स, तन्नू वेड्स मन्नू यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये तर त्याला सुपरस्टार ही पदवी मिळाली आहे. अनेक वर्षं चित्रपटात काम केल्यानंतर आता माधवन वेबसिरिजकडे देखील वळला आहे. त्याची ब्रीथ ही वेबसिरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. ही वेबसिरिज चांगलीच गाजली होती. आर माधवन त्याच्या भूमिकांच्या बाबतीत खूपच चोखंदळ असल्याने तो खूपच कमी चित्रपटांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यातही त्याचे हिंदी चित्रपटात काम करण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे माधवनचा आगामी हिंदी चित्रपट कोणता असणार याची उत्सुकता त्याच्या फॅन्सना लागलेली असते. त्याच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. शाहरुख खानच्या झिरो या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात शाहरुख एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळणार आहे. शाहरुखच्या या चित्रपटात अनेक प्रसिद्ध कलाकार आपल्याला पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा देखील शेवटचा चित्रपट आहे. या चित्रपटात काही मिनिटांसाठी त्यांना आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचसोबत आता बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता देखील आपल्याला या चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. आर माधवन या चित्रपटात एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असून या चित्रपटात त्याच्यासोबत आपल्याला जिमी शेरगिलला देखील पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे. आर माधवनचे तन्नू वेड्स मन्नू आणि तन्नू वेड्स मन्नू रिटर्न हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या दोन्ही चित्रपटात प्रेक्षकांना त्याच्यासोबत जिमी शेरगिलला पाहायला मिळाले होते. आता झिरो या चित्रपटात देखील प्रेक्षकांना जिमी आणि माधवनची जोडी पाहायला मिळणार असल्याने त्यांची केमिस्ट्री या चित्रपटात देखील पाहाण्यासाठी त्यांचे फॅन्स या चित्रपटाची नक्कीच आतुरतेने वाट पाहाणार आहेत यात काही शंकाच नाही. Also Read : आर माधवनने दिवाळीनिमित्त खरेदी केली ४० लाखाची मोटरसायकल...