बॉलिवूड अभिनेता आर. माधवनचा आगामी चित्रपट 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट'ची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. दरम्यान या चित्रपटाची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील घेतली आहे. त्यांनी 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट'बद्दल ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, या चित्रपटात महत्त्वपूर्ण विषय आहे, जो लोकांनी माहित करून घेतला पाहिजे. आर माधवन आणि शास्त्रज्ञ एस. नंबी नारायण सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले होते. त्यानंतर मोदींनी ट्विट केले. 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' हा चित्रपट शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारीत आहे. या चित्रपटातून आर. माधवनने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये लिहिले की, तुम्हाला (माधवन) आणि प्रतिभावंत नंबी नारायणन यांना भेटून मला आनंद झाला. 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' या चित्रपटात महत्त्वपूर्ण विषय रेखाटण्यात आला आहे, ज्याबद्दल जास्तीत जास्त लोकांना माहित असले पाहिजे. आपल्या शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी आपल्या देशासाठी महान बलिदान दिले आहे, ज्याची झलक 'रॉकेट्री'च्या क्लीपमध्ये दिसली.
खरेतर आर. माधवनने चित्रपटाची क्लीप पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले होते. हा चित्रपट हेरगिरीच्या खोट्या आरोपाखाली तुरुंगात गेलेल्या एरोस्पेस अभियंता नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचा ट्रेलर १ एप्रिलला रिलीज केला होता. या चित्रपटात अभिनेता आर. माधवन नंबी यांची भूमिका साकारतो आहे. 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' हिंदी, तेलुगू, मलयालम, तमिल, अंग्रेजी आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.