बॉलिवूड अभिनेता आर माधवन (R Madhavan) सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. त्याचा चित्रपट ‘रॉकेट्री: द नम्बी इफेक्ट’(Rocketry: The Nambi Effect)चा प्रिमियर नुकताच ७५ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झाला. या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीदेखील आर माधवनची आहे. कान्समधील स्क्रिनिंगनंतर या चित्रपटाला १० मिनिटांचं स्टँडिंग ऑवेशनही मिळाले. आर माधवनच्या या चित्रपटाची सध्या खूप प्रशंसा होताना दिसते आहे. दरम्यान नुकत्याच एका मुलाखतीत आर. माधवननं त्याच्या कमाईबाबतचा मोठा खुलासा केला आहे. जे ऐकून त्याचे चाहते हैराण झाले आहेत.
आर. माधवनने एका मुलाखतीत सांगितले की, “मला माझ्या आगामी चित्रपटाबाबत खूप भीती वाटते आहे. त्याच्या कमाईबाबतही काळजी आहेच. मागील दोन वर्षे कोरोनामध्ये गेली आणि त्याआधीची दोन वर्षे मी या चित्रपटासाठी दिली. या चार वर्षांमध्ये मी एक रुपयाही कमावलेला नाही. ओटीटी ही एकमेव गोष्ट आहे ज्याने मला आतापर्यंत सांभाळले आहे. माझा शेवटचा प्रदर्शित झालेला चित्रपट ‘विक्रिम वेधा’ होता. त्यानंतर मी Decoupled या वेब सीरिजमध्ये काम केले. ही सीरिज ओटीटीवर रिलीज झाली होती. त्यामुळे आता माझा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालणार की नाही याची चिंता मला आहे. तसेच अभिनेत्याने या मुलाखतीत त्याच्या पत्नीचे आभार मानले. मागच्या चार वर्षांच्या कठीण काळात तिची मोलाची साथ मिळाल्याचे त्याने सांगितले.
‘रॉकेट्री: द नम्बी इफेक्ट’ चित्रपटाबद्दल सांगायचे तर या चित्रपटात आर. माधवन डॉक्टर नम्बी नारायणन यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट भारतीय वैज्ञानिक आणि एअरस्पेस इंजिनिअर नम्बी नारायणन यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्यांना खऱ्या आयुष्यात गुप्तहेरीच्या खोट्या केसमध्ये फसवण्यात आले होते. या चित्रपटात शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या भाषांमध्ये रिलीज होणार आहे.