प्रसिध्द संगीतकार ए. आर. रहमान नाही पण त्यांची मुलगी खातीजा सध्या जाम चर्चेत आहे. होय, खतीजा कायम बुरख्यात असते. यावरून ती अनेकदा ट्रोलही झालीय. अलीकडे बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनीही खतीजाच्या बुरख्यावर निशाणा साधला होता. आता खतीजाने तस्लिमा यांच्या या टीकेवर उत्तर दिले आहे.
होय, तस्लिमा यांनी यासंदर्भात एक ट्वीट केले होते. त्यांचे हे ट्वीट सध्या व्हायरल झाले होते. ‘मला ए. आर. रहमानचे संगीत आवडते. पण जेव्हा केव्हा मी त्याच्या मुलीला बुरख्यात बघते, तेव्हा माझा श्वास गुदमरतो. सुसंस्कृत कुटुंबातील एका शिकलेल्या महिलेचेही किती सहजपणे बे्रनवॉश केले जाऊ शकते, हे बघणे खरोखरच निराशाजनक आहे,’ असे ट्वीट तस्लिमा नसरीन यांनी केले होते. आता खतीजाने सोशल मीडियावर पोस्ट लिहून तस्लिमांच्या ट्वीटला उत्तर दिले आहे.
काय म्हणाली खतीजा
तस्लिमा यांच्या ट्वीटला उद्देशून खतीजाने लिहिले, ‘माझ्या कपड्यांना बघून तुमचा श्वास गुदमरतो, याबद्दल सर्वप्रथम माफी मागते. तुम्ही प्लीज, बाहेर पडून मोकळी हवा खा. कारण या कपड्यांमध्ये माझा श्वास कधीच गुदमरत नाही. उलट या कपड्यांचा मला अभिमान वाटतो. प्लीज, तुम्ही गुगलवर फेमिनिज्मचा अर्थ जरूर शोधा. कारण दुसºया महिलांना तुच्छ लेखणे आणि कुण्या महिलेच्या वडिलांना अशा मुद्यामध्ये गोवणे हे फेमिनिज्म नाहीच. माझ्या फोटोवर तुम्ही बोलावे, यासाठी मी माझा फोटो तुमच्याकडे कधी पाठवला होता, हे मला आठवत नाही.’
याआधी लोकांनी खतीजाला बुरख्यावरून ट्रोल केल्यानंतर तिने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले होते. ‘माझ्यामुळे माझ्या वडिलांची चर्चा होते. एवढ्या सगळ्या प्रतिक्रियांची अपेक्षाही मी केली नव्हती. काही कमेंटमध्ये चक्क माझ्या कपड्यांवरुन माझ्या वडिलांना लक्ष्य करण्यात आलेय. त्यांनीच मला असे कपडे बंधनकारक केले, ते दुटप्पी आहेत, असे काय काय लोक म्हणत आहेत. मला एवढेच सांगायचे आहे की मी जे कपडे परिधान करते किंवा निवडते त्याचा माझ्या आई-वडिलांशी काडीचाही संबंध नाही. प्रत्येकाला आपले कपडे निवडण्याचा आपल्या मनाप्रमाणे राहण्याचा अधिकार आहे. आणि मी तेच करत आहे. त्यामुळे कृपया परिस्थिती जाणून घेण्याआधीच आपले निष्कर्ष काढू नका,’ असे खतीजाने म्हटले होते.