यंदा स्वातंत्र्यदिनी अॅमेझॉन प्राईमवर प्रसिद्ध गायक व संगीतकार ए.आर. रेहमान यांच्या संगीताचा आनंद 'हार्मानी विथ ए. आर. रेहमान' या सीरिजमध्ये लुटता येणार आहे. ही सीरिज पाच एपिसोडची असून कवितालयने याची निर्मिती केली आहे आणि सूत्रसंचालन ए.आर. रेहमान यांनी केले आहे. या सीरिजच्या माध्यमातून ते डिजिटल माध्यमात पदार्पण करत आहेत.
'हार्मानी विथ ए. आर. रेहमान' या सीरिजमध्ये चार वाद्ये व स्वर परंपरांच्या माध्यमातून भारताच्या संगीतमय वारसाचा शोध घेतला जाणार आहे आणि आधुनिक भारतीय संगीत संस्कृतीला पुनःसंदर्भित करण्यात येणार आहे. अंतिम भागात सतरा मिनिटांच्या उत्कंठावर्धक कार्यक्रमात चार संगीतकाराच्या परफॉर्मन्ससोबत रेहमान यांचे संगीत कौशल्य पाहायला मिळणार आहे. तसेच महाराष्ट्र, केरळ, सिक्किम व मणिपूर या नयनरम्य ठिकाणी कलाकारांसोबतचे चर्चासत्रे देखील पाहता येणार आहे. ए.आर. रेहमान म्हणाले की, 'या शोच्या संकल्पेनेनेच मला या शोचा भाग होण्यास प्रवृत्त केले. या सीरिजच्या माध्यमातून पारंपारिक वाद्यांसोबतच समकालीन संदर्भ व नवनवीन कलेमधून उत्तम संगीत निर्माण करण्याचा उद्देश होता. हा शो डिजिटल क्षेत्रातील पदार्पणाला सादर करतो. मी अॅमेझॉन प्राईम व्हिडिओसारख्या जागतिक मंचावर आपली भारतीय परंपरा दाखवण्याच्या संधीचा भाग असण्यासाठी व प्रेक्षकांना हा संगीतमय आनंद देण्यासाठी खूपच उत्सुक आहे.'