कलाकार - प्रभास, पूजा हेगडे, भाग्यश्री, सचिन खेडेकर,जगपती बाबू, मुरली मिश्रा, कुणाल रॉय कपूर
दिग्दर्शक- राधा कृष्ण कुमार
निर्मिते - भूषणकुमार, वामसी, प्रमोद उप्पलपती
कालावधी - २ तास १८ मिनिटे
Radhe Shyam Review: दाक्षिणात्य कलाविश्वातील 'बाहुबली' अर्थात अभिनेता प्रभास (prabhas) याच्या प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. प्रभासच्या प्रत्येक चित्रपटात प्रेक्षकांना काही तरी नवीन पाहायला मिळतं. त्यात जोडीला अॅक्शन सीन आणि दमदार कथानक यांची जोड असतेच. त्यामुळे प्रभासचे चित्रपट म्हटले की प्रेक्षकांसाठी जणू एक प्रकारची वर्णीच असते. त्यातच गेल्या कित्येक दिवसांपासून त्याच्या 'राधे श्याम' (radhe shyam) या चित्रपटाची चर्चा रंगली होती. या चित्रपटात पहिल्यांदाच प्रभास आणि अभिनेत्री पूजा हेगडे यांची रोमॅण्टिक केमिस्ट्री उलगडली जाणार होती. त्यांमुळे प्रेक्षक आतुरतेने या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत होते. अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे हा चित्रपट पाहिल्यानंतर 'पैसा वसूल' अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांमधून उमटत आहे. त्यामुळे हा चित्रपट नेमका कसा आहे हे थोडक्यात पाहुयात.
राधाकृष्ण कुमार दिग्दर्शित 'राधे श्याम' हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि तामिळ या तीन भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. पीरियॉडिक रोमॅण्टिक ड्रामा प्रकारात असलेला हा चित्रपट अनेक कारणांसाठी सध्या चर्चेत येत आहे. या चित्रपटात कलाकारांची मोठी मांदियाळी असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे ज्या प्रमाणे या चित्रपटाची काही वैशिष्ट्य आहेत. तशाच काही त्रुटीदेखील असल्याचं पाहायला मिळतं. मात्र, दिग्दर्शकांनी केलेला राधे श्यामचा प्रयोग प्रेक्षकांच्या दृष्टीने यशस्वी ठरला आहे.
काय आहे चित्रपटाची कथा?
11 मार्च रोजी प्रभास आणि पूजा हेगडे (pooja hegde) यांची मुख्य भूमिका असलेला 'राधे श्याम' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात प्रभासने एका ज्योतिषाची भूमिका साकारली आहे. आदित्य असं त्याच्या भूमिकेचं नाव असून हा आदित्य प्रेम आणि नशीब यांच्यामध्ये अडकला आहे. आदित्य केवळ एक ज्योतिषीच नसतो तर त्याच्याकडे काही अलौकिक शक्तीही असतात. मात्र, प्रेम आणि नशीब या दोघांमध्ये तडजोड करत असतानाच त्याच्या जीवनात एक मोठा ट्विस्ट येतो.आता तो ट्विस्ट नेमका कसा आहे. यात पूजा हेगडेची एन्ट्री कशी होते हे प्रेक्षकांना चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे. या चित्रपटाच प्रभास आणि पूजाव्यतिरिक्त भाग्यश्री, सचिन खेडेकर, सत्यराज, मुरली शर्मा, कुणाल रॉय कपूर ही कलाकार मंडळीदेखील झळकली आहेत.
सिनेमॅटोग्राफी कशी आहे?
चित्रपटाची रंगत वाढवण्यासाठी वा तो चित्रपट प्रेक्षकांपर्यंत थेट पोहोचवण्यासाठी प्रत्येक चित्रपटात सिनेमॅटोग्राफीचा वापर केला जातो. विशेष म्हणजे राधे श्याममध्येही दिग्दर्शकांनी सिनेमॅटोग्राफीचा उत्तमरित्या वापर केला आहे. प्रत्येक लहान लहान गोष्टींकडे बारकाव्याने लक्ष दिलं आहे. तसंच चित्रपटासाठी अत्यंत सुंदर लोकेशन्सची निवड केली आहे.
नेमकी कशी आहे कथा?
प्रत्येक भारतीय चित्रपटाप्रमाणेच या चित्रपटाची कथाही हिरो, हिरोईन आणि व्हिलेन याच भोवती फिरताना दिसते. परंतु, प्रभास आणि पूजा हेगडे यांचा हा रोमॅण्ट्रिक ड्रामा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकून घेतो. नेहमीप्रमाणे जरी या चित्रपटात प्रेमकथा असली तरीदेखील हा प्रेमकथेत थोडंसं वेगळेपण आहे.
कसा आहे कलाकारांचा अभिनय?
नेहमीप्रमाणेच प्रभासने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नेहमीप्रमाणे त्याने त्याच्या कम्फर्टे झोनच्या बाहेर जाऊन काम केलं आहे आणि ते यशस्वीदेखील झालं आहे. तसंच पूजा हेगडेच्याही अभिनयाची एक नवी बाजू यातून दिसून येत आहे. तसंच चित्रपटातील सचिन खेडेकर, भाग्यश्री, मुरली शर्मा या कलाकारांनीही नेहमीप्रमाणे त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
चित्रपटात काय त्रुटी आहेत?
चित्रपटाची कथा आणि कलाकारांचा अभिनय जरी उत्तम असला तरीदेखील काही किरकोळ त्रुटी या चित्रपटात आहेत. सुरुवातीच्या काळात या चित्रटातील गाण्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, ही गाणी आणखी सुंदररित्या सादर करता आली असती. तसंच चित्रपटाची सुरुवात चांगली होते. मात्र, सेकंड हाफ थोडासा कंटाळवाणा होताना दिसतो. परंतु, प्रभास आणि अन्य कलाकारांच्या दमदार अभिनय जर अनुभवायचा असेल तर चित्रपटगृहांमध्येच हा चित्रपट जरुर पाहावा.