अभिनेत्री राधिका आपटेने (Radhika Apte) बॉलिवूड तसंच हॉलिवूडमध्येही आपला डंका गाजवला आहे. दोन महिन्यांपूर्वी राधिकाने लंडन फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर येत सर्वांना सुखद धक्का दिला. राधिका तेव्हा गरोदर होती. तिने त्याआधी ही बातमी कुठेच दिली नव्हती. रेड कार्पेटवर येताच तिच्या बेबी बंपमुळे तिच्या गरोदरपणाची बातमी सर्वांना समजली. तर आता राधिकाने एक आठवड्यापूर्वीच बाळाला जन्म दिला आहे.
राधिका आपटेने नुकतीच इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. तिने तान्ह्या बाळासोबतचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती लॅपटॉपवर काम करत आहे तर सोबतच बाळाला ब्रेस्टफीडिंगही करत आहे. या गोड फोटोसोबत राधिकाने कॅप्शन देत लिहिले, "बाळाच्या जन्माच्या एका आठवड्यानंतर माझी पहिली वर्क मीटिंग.' सोबतच तिने ब्रेस्टफीडिंग, आशीर्वाद, मदर अॅट वर्क, सुंदर चॅप्टर, 'बेबी गर्ल' असे हॅशटॅग दिले आहेत. तिच्या हॅशटॅगवरुनच तिने लेकीला जन्म दिल्याचं स्पष्ट होत आहे. राधिकाचा नवरा बेनेडिक्ट टेलरनेच हा फोटो काढला आहे.
राधिका या फोटोत खूप आनंदी दिसत आहे. तिच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत अभिनंदनाचा वर्षाव केला. वयाच्या ३९ व्या वर्षी तिने बाळाला जन्म दिला. गरोदरपणाचा संपूर्ण प्रवास तिने काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. यामध्ये कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला हेही तिने शेअर केलं होतं. आता बाळाच्या जन्मानंतर एका आठवड्यातच ती पुन्हा कामालाही लागली आहे.
राधिकाने २०१२ साली बेनेडिक्ट टेलरशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. बेनेडिक्ट हा ब्रिटीश व्हॉयलिन प्लेअर आणि संगीतकार आहे. लग्नानंतर आता १२ वर्षांनी दोघं आईबाबा झाले आहेत. त्यांच्या आयुष्यातील या नव्या प्रवासाला सुरुवात झाली आहे.