राधिका आपटेने म्हटले, मासिक पाळीबद्दल फक्त आईनेच मुलीबरोबर का संवाद साधावा, वडिलांनी का नाही?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2018 2:35 PM
अक्षयकुमार, राधिका आपटे आणि सोनम कपूर यांचा ‘पॅडमॅन’ येत्या ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एक ...
अक्षयकुमार, राधिका आपटे आणि सोनम कपूर यांचा ‘पॅडमॅन’ येत्या ९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एक अतिशय प्रभावी असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. महिलांना मासिक पाळीदरम्यान कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो अन् समाजाचा याविषयीचा काय दृष्टिकोन आहे हा महत्त्वपूर्ण विषय या चित्रपटात हाताळण्यात आला आहे. सध्या या चित्रपटातील सर्वच कलाकार प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. एकीकडे सोशल मीडियावर सॅनिटरी पॅडसोबत एक कॅम्पेन चालविले जात असून, दुसरीकडे इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज अभिनेते त्याचे स्वागत करताना दिसत आहेत. त्याचबरोबर चित्रपटाशी संबंधित कलाकारही या विषयावर भाष्य करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची निर्माती ट्विंकल खन्ना हिने म्हटले होते की, मासिक पाळीदरम्यान महिलांना घरी बसण्याचा सल्ला देणे योग्य नाही. तसेच महिलांनी मासिक पाळीत सुट्टी घेण्याचा बहाना करू नये. मात्र अशा अवस्थेत जर वेदना होत असतील तर नक्कीच त्या महिलेने आॅफिसला जाणे टाळावे.’ आता ट्विंकलच्या या व्यक्तव्यानंतर अभिनेत्री राधिका आपटे हिनेदेखील तिचे मत मांडले आहे. राधिकाने म्हटले की, पुरुषमंडळी याविषयी बोलत नाहीत. महिलादेखील पुरुषांसोबत याविषयी बोलणे टाळतात. वास्तविक हा विषय पुरुष किंवा महिला यापुरता मर्यादित नाही. तर आपण कशा समाजात वावरतो यावर विचार करण्यासारखा आहे. एक आई याविषयी आपल्या मुलीसोबत बोलत असते. परंतु एक वडील यावर बोलत नाही. वास्तविक वडिलांनीही आपल्या मुलीला मासिक पाळीविषयी बोलायला हवे. आई-वडील दोघांनीही आपल्या मुलीला मासिक पाळीविषयी सांगायला हवे. पुढे बोलताना राधिकाने म्हटले की, हा चित्रपट खूपच चांगला आणि प्रोत्साहन देणारा आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आम्ही लोकांशी बोलण्यास सुरुवात केली आहे. मासिक पाळीदरम्यान महिलांनी स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यायला हवे. कारण महिलांनी स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले तर त्यांना विविध आजारांची लागण होण्याची शक्यता बळावते, असा सल्लाही राधिकाने दिला.