सप्टेंबरमध्ये ४७व्या टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (TIFF) मध्ये यशस्वी वर्ल्ड प्रीमियर झाल्यानंतर, जिओ स्टुडिओज आणि मँगो पीपल मीडिया निर्मित कच्चे लिंबू चित्रपटाची आता बँकॉकच्या जागतिक चित्रपट महोत्सव आणि केरळच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFK) अधिकृत निवड झाली आहे. कच्चे लिंबू मध्ये राधिका मदन ( अंग्रेजी मिडीयम), रजत बरमे (उडान) आणि आयुष मेहरा (कॉल माय एजंट – बॉलीवूड) हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत आणि नवोदित चित्रपट निर्माते शुभम योगी यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे. ज्योती देशपांडे, प्रांजल खंडडिया आणि नेहा आनंद निर्मित, कच्चे लिंबू ला TIFF मधील सादरीकरणात गाला कार्यक्रमाचा एक भाग म्हणून दाखवले गेले होते.
मुख्य अभिनेत्री राधिका मदन आनंद व्यक्त करत म्हणाली कि, “टीआयएफएफच्या वर्ल्ड प्रीमियरनंतर, आमच्या कच्चे लिंबू चित्रपटाला जगाच्या विविध भागांमध्ये प्रेम मिळत आहे हे आश्चर्यकारक आहे. बँकॉक आणि IFFK च्या जागतिक चित्रपट महोत्सवांमध्ये त्याची निवड झाल्याबद्दल मला आनंद झाला आहे. हा एक असा चित्रपट आहे जो माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे आणि तो प्रेक्षक कधी एकदाचे बघतायत या साठी मी आतुर झालीय ".
राधिका प्रमाणेच आपल्या भावना जाहीर करत शुभम योगी म्हणाले की, “कच्चे लिंबू हा तुमचा आवाज शोधणारा चित्रपट आहे आणि तो एका सामान्य वाढत्या अनुभवातून तयार झाला आहे. TIFF मधील यशस्वी प्रदर्शनानंतर, या चित्रपटाला बँकॉक आणि IFFK चित्रपट महोत्सवांसारख्या प्रतिष्ठित महोत्सवांमध्ये एक व्यासपीठ मिळाल्याबद्दल मी स्वतः धन्य आणि कृतज्ञ आहे. एक नवोदित चित्रपट निर्माता म्हणून यापेक्षा चांगली सुरुवात होवूच शकत नाही.”
कच्चे लिंबू सिनेमाची हृदयस्पर्शी कहाणी ही भवाडांवर आधारित आहे. ही कथा अदितीची आहे, एक अशी तरुण मुलगी जी प्रत्येकाने तिच्यावर लादलेली स्वप्ने पूर्ण करण्याच्या शर्यतीत असते आणि प्रत्येक वेळी ती यशस्वी ही होते. धैर्याची, दृढनिश्चयाची आणि स्वतःला शोधून काढण्याची ही कथा आहे. एक भावनिक रोलरकोस्टर आहे ज्यामध्ये ती तिच्या कुटुंबाला, मित्रांना आणि विशेषत: तिच्या मोठ्या भावाला हे सिद्ध करण्याचा निर्णय घेते कि, जीवनात कधी कधी गोंधळात पडणे ही वाईट गोष्टच असते असे काही नाही, योग्य निर्णय तुमच्यापर्यंत योग्य वेळी पोहोचेलच. बँकॉकचा जागतिक चित्रपट महोत्सव २ डिसेंबरपासून सुरू होईल आणि ११ डिसेंबर रोजी संपेल. केरळचा २७ वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव ९ ते १६ डिसेंबर या कालावधीत तिरुअनंतपुरम येथे होणार आहे.