डान्सर आणि आता अभिनेता अशी ओळख मिळवलेला राघव जुयाल (Raghav Juyal) नुकताच 'किल' या अॅक्शन थ्रिलर सिनेमात दिसला. यात त्याची खलनायकाची भूमिका होती. ट्रेनमधील अॅक्शन सीनने प्रत्येकाच्या अंगावर काटा आणला. राघव लवकरच आर्यन खान (Aryan Khan) दिग्दर्शित वेबसीरिज 'स्टारडम' मध्ये दिसणार आहे. नुकतंच एका मुलाखतीत राघवने आर्यन खानच्या कठीण काळावर भाष्य केलं आहे.
शुभंकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत राघव जुयाल म्हणाला, "लोक व्ह्यूजसाठी बॉलिवूड विरोधात बोलतात. आर्यनला ड्र्ग्स केसमध्ये ताब्यात घेतलं तेव्हा माध्यमांनी त्याच्याशी चुकीचं वर्तन केलं. शेवटी काय झालं? सगळे आरोप तर खोटे निघाले. माध्यमांनी केवळ व्ह्यूज, टीआरपी आणि तो शाहरुखचा मुलगा असल्याने त्याला लक्ष्य केलं. हा माध्यमांचा गर्व आहे आणि नंतर त्यांच्या हाती काही लागले नाही. या लोकांनी मुलाचं आयुष्य खराब केलं. ज्याप्रकारे ते एखाद्या गाढवाप्रमाणे त्याच्यावर चढले ते खरंच चुकीचं होतं."
"एका २३-२४ वर्षांच्या मुलाला तुम्ही त्रास दिला. त्याचाजागी आपला भाऊ, मुलगा असता तर आपण विचारही करु शकत नाही. ही तुमची पत्रकारिता आहे का? एखाद्या गोष्टीची मर्यादा असते ती मर्यादा त्यावेळी माध्यमांनी पार केली."
'स्टारडम' ही आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली बनणारी पहिली वेबसीरिज आहे. यामध्ये शाहरुख खान आणि रणवीर सिंहही कॅमिओ करणार आहेत. स्टारडम मध्ये अशी कहाणी आहे जे लोक इंडस्ट्रीत आपण नाव आणि ओळख बनवण्यासाठी आले आहेत.