पाकिस्तानी गायक उस्ताद राहत फतेह अली खान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये राहत फतेह अली खान हे त्यांच्या घरी एका तरुणाला मारहाण करत असल्याचे आणि फटकारत असल्याचे दिसत आहेत. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरून लोक संताप व्यक्त करत आहेत. राहत फतेह अली खान यांनी पाकिस्तानी मालिकांसोबत बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्येही गाणी गायली आहेत, तसेच यातील अनेक गाणी सुपरहिट झाली आहेत. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राहत फतेह अली खान हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
समा टीव्हीने शेअर केलेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये प्रसिद्ध पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान मद्याची मागणी करत लोकांसमोरच एका तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत. त्यानंतर राहत फतेह अली खान यांनी नंतर आपला शिष्य आणि त्याच्या वडिलांसोबत एक व्हिडीओ प्रसिद्ध करून स्पष्टीकरण दिले आहे.
व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितले की, जी बाटली त्यांनी मागवली होती, त्यामध्ये मद्य नव्हते. तर त्यामध्ये एका धार्मिक मौलवींनी दिलेलं पवित्र पाणी होतं. ही पोस्ट पाकिस्तानमधील वरिष्ठ पत्रकार तारिक मतीन यांनी शेअर केला होता. स्पष्टीकरणाच्या व्हिडीओमध्ये राहत फतेह अली खान यांनी सांगितले की, ही एक शिष्य आणि गुरूमधील संवाद आहे. राहत फतेह अली खान यांनी गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूडच्या सिनेमांमध्ये ओ रे पिया, तेरे मस्त मस्त दो नैन, मन की लगन, जिया धडक धडक, या सारखी प्रसिद्ध गाणी गायली आहेत.