पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) यांना दुबईविमानतळावरुनअटक करण्यात आली आहे. लाईव्ह परफॉर्मन्ससाठी ते दुबईला आले होते. मात्र विमानतळावर येताच अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. काही तासांच्या चौकशीनंतर त्यांना बुर्ज दुबई पोलिस स्थानकात नेण्यात आले. मीडिया रिपोर्टनुसार, माजी मॅनेजरच्या तक्रारीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र काही वेळाने officialrfakworld या अकाऊंटवरुन त्यांनी वृत्त नाकारलं.
नेमकं प्रकरण काय?
राहत फतेह अली खान यांचा माजी मॅनेजर सलमान अहमदसोबत काही महिन्यांपासून वाद सुरु आहे. त्यांनी सलमानला नोकरीवरुन काढून टाकले होते. यानंतर आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सलमान अहमदने त्यांच्याविरोधात दुबईसह इतर काही ठिकाणीही तक्रार दाखल केली. दुबई विमानतळावर काही तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली.
राहत फतेह अली खान यांचा काही महिन्यांपूर्वी एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. यामध्ये ते नशेत आपल्या नोकराला मारताना दिसत होते. यानंतर त्यांनी माफीही मागितली होती. आता पुन्हा गायक अडचणीत सापडले आहेत.
दरम्यान, राहत फतेह अली खान यांचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या अटकेचे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले आहे. "मी माझी गाणी रेकॉर्ड करण्यासाठी दुबईला आलो आहे. सर्व काही छान आहे. मी तुम्हाला विनंती करतो की वाईट अफवांवर लक्ष देऊ नका," असे ते म्हणताना दिसत आहेत. परंतु, या व्हिडीओची सत्यता अद्याप पडळण्यात आलेली नाही
राहत फतेह अली खान यांच्या गायकीचे अनेक चाहते आहेत. पाकिस्तानात तर ते प्रसिद्ध गायक आहेत. त्यांची 'आफरीन','तू इतनी खूबसूरत है','तूम्हे दिल्लगी भूल जानी पडेगी' सह अनेक गाणी गाजली आहेत.