बॉलिवूड अभिनेता राहुल बोस याने चंदीगडमधील एका फाईव्ह स्टार हॉटेलात दोन केळी ऑर्डर केलीत आणि हॉटेलने चक्क 442 रूपयांचे बिल फाडले. राहुलने सोशल मीडियावर हे बिल शेअर केले आणि यावरून एका वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले. अव्वाच्या सव्वा बिल आकारणा-या अशा अलिशान हॉटेल व्यवस्थापनाविरोधात अनेकांनी रोष व्यक्त केला. आता चंदीगडचे डेप्युटी कमिशनर, एक्साइज-टॅक्सेशन कमिशन मंदीप सिंह बरार यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिलेत.राहुल बोसने जो व्हिडीओ पोस्ट केला, त्याची दखल घेत मी चौकशीचे आदेश दिले आहेत. J W Marriott ने ताज्या फळांवर जीएसटी कसा आकारला? याची चौकशी होईल. यात हॉटेल व्यवस्थापन दोषी आढळल्यास त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे बरार यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण होय, राहुल बोस चंदीगडच्या J W Marriott या 5 स्टार हॉटेलात मुक्कामाला होता. या मुक्कामातील एक अनुभव राहुलने सोशल मीडियावर शेअर केला होता. राहुलने हॉटेलमध्ये वर्कआऊट करत होता. यादरम्यान त्याने स्वत:साठी दोन केळी ऑर्डर केलीत. वेटर लगेच दोन केळी घेऊन आला. पण या दोन केळींचे बिल पाहून राहुलचे डोळे पांढरे झालेत. होय, राहुलने केवळ दोन केळी खाल्ली. या दोन केळींसाठी त्याला 442 रूपये मोजावे लागलेत. राहुलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता. शिवाय यानंतर लक्झरी हॉटेलातील मनमानी बिल वसूलीवर वेगवेगळी चर्चा सुरु झाली होती. अनेक युजर्सनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या होत्या. ‘तू शेक मागवले असते तर त्याचे बिल आयफोन इतके असते,’ असे एका युजरने गमतीत लिहिले होते. ‘ राहुल, तू खाल्लेली केळी त्यांनी ऑस्ट्रेलियातून मागवली होती, म्हणून त्यांनी इतके बिल फाडले,’ असे एका युजरने लिहिले होते.