राहुल रवैल यांचा अमोल पालेकरांवर 'निशाणा'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 1:20 AM
'कोर्ट' या मराठी चित्रपटाच्या निवडीला ऑस्कर निवड समितीचे अध्यक्ष असलेले अमोल पालेकर यांनीच विरोध केल्याचा गौप्यस्फोट ज्येष्ठ दिग्दर्शक राहुल ...
'कोर्ट' या मराठी चित्रपटाच्या निवडीला ऑस्कर निवड समितीचे अध्यक्ष असलेले अमोल पालेकर यांनीच विरोध केल्याचा गौप्यस्फोट ज्येष्ठ दिग्दर्शक राहुल रवैल यांनी केला आहे. ऑस्करसाठी ' कोर्ट' च्या निवडीला प्रथम विरोध करीत नंतर 'असे काही घडलेच नाही' अशा अविर्भावात यांनी लगेच काहीशी पलटी मारली असेही ते 'सीएनएक्स' बोलताना म्हणाले. आपला पालेकर यांच्या कार्यपध्दतीला विरोध असल्यानेच निवड समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले.रवैल म्हणाले, ''ऑस्कर करिता भारतीय चित्रपटांच्या निवडीसाठी आयोजित केलेल्या बैठकीत पालेकरांनी आपली पत्नी संध्या गोखले आणि मुलीला बसण्याची परवानगी दिली असल्याचा गौप्यस्फोट करीत रवैल यांनी बैठकीचा इतवृत्तांत 'सीएनएक्स' शी बोलताना कथन केला. बैठकीमध्ये चित्रपटांविषयी चर्चा सुरू असताना पालेकर प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करीत होते. कोर्ट चित्रपटाची निवड व्हावी असे त्यांना मुळीच वाटत नव्हते.मते फिरवणे, चुकीची मतमोजणी, जाहीर केली जाणारी फसवी मतसंख्या आणि खोटे बहुमत हा प्रकार संतापजनक होता. मतसंख्या दाखविण्यास त्यांनी नकार दिला. फेरमतमोजणीची विनंतीही फेटाळण्यात आली. खरेतर त्यांच्या आणि अमोल पालेकर यांच्या डोक्यात वेगळाच चित्रपट होता, तो कोणता हे मी सांगू शकत नाही. मुळात त्यांची बायको बैठकीला बसूच कशी शकते? त्यांना बसविण्यामागचा हेतू काय? याची उत्तरे पालेकरांनी द्यावीत. त्यांना बैठकीमध्ये बसू न देण्यासाठी एकाही ज्यूरी सदस्याने विरोध केला नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे. मी जर खोटं बोलत आहे असे वाटत असेल तर पालेकर आणि मला एखाद्या वृत्तवाहिनीवर समोरासमोर आणावे मग 'दूध का पानी' होईल, असे आव्हानही त्यांनी दिले.