Join us

‘रईस’ शाहरूख खान हाजीर हो; न्यायालयाने बजावला समन्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2017 4:33 PM

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान सध्या त्याच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र आता तो ...

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान सध्या त्याच्या आगामी ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मात्र आता तो अडचणीत सापडला असून, त्याला न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. वास्तविक ‘रईस’ शाहरूख खानला त्याच्यातील मोठेपणा महागात पडला आहे. हे प्रकरण ‘रईस’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानचे आहे. शाहरूखला गुजरातच्या वडोदरा न्यायालयाने समन्स पाठविला असून, त्यानुसार त्याला येत्या २७ जुलैला न्यायालयात हजर व्हावे लागणार आहे. तुम्हाला कदाचित ही घटना आठवत असेल. शाहरूख ‘रईस’च्या प्रमोशनसाठी ट्रेनने प्रवास करण्यासाठी निघाला होता. मुंबई रेल्वेस्टेशनवरून तो दिल्लीकडे ‘अगस्त क्रांती एक्स्प्रेस’ने निघाला होता. यादरम्यान जेव्हा ट्रेन वडोदरा स्टेशनवर थांबली तेव्हा शाहरूखची एक झलक बघण्यासाठी उपस्थितांनी एकच कल्लोळ केला. गर्दी बेभान झाल्याने पोलिसांनाही त्यांच्यावर नियंत्रण मिळविणे अवघड झाले होते. गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांना त्यांच्यावर लाठीचार्ज करावा लागला. मात्र या चेंगराचेंगरीत सामाजिक कार्यकर्ता फहीद खान यांचा मृत्यू झाला होता. शिवाय एका पोलीस अधिकाºयांसह बरेचसे लोकही जखमी झाले होते. मात्र त्यानंतर हे स्पष्ट झाले की, फहीदचा मृत्यू हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने झाला होता. मात्र लोकांची गर्दी शाहरूखमुळेच झाल्याने हे प्रकरण न्यायालयापर्यंत गेले. २३ जानेवारी रोजी घडलेली ही घटना आता पुन्हा एकदा समोर आल्याने शाहरूखच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता शाहरूखला न्यायालयात हजर व्हावे लागणार आहे. दरम्यान, शाहरूख या प्रकरणाकडे कशा पद्धतीने बघतो, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. सध्या शाहरूख त्याच्या ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात शाहरूखबरोबरच अभिनेत्री अनुष्का शर्माची प्रमुख भूमिका आहे. आतापर्यंत या चित्रपटाची बरेचशी गाणी आणि मिनी ट्रेलर रिलीज करण्यात आले आहेत. इम्तियाज अली यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट रोमॅण्टिक स्टोरीवर आधारित आहे. चित्रपटात शाहरूख पंजाबी तरुणाची तर अनुष्का गुजराथी मुलीची भूमिका साकारताना बघावयास मिळणार आहे.