Join us

अखेर ठरली राज कपूर व दिलीप कुमार यांच्या पाकिस्तानातील वडिलोपार्जित घरांची किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 1:33 PM

पाकिस्तान सरकारने घेतला हा मोठा निर्णय

ठळक मुद्देपेशावरमध्ये अशा स्वरूपाच्या 1800 ऐतिहासिक इमारती असून त्यापैकी अनेक इमारती 300 वर्षे जुन्या आहेत.

बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर आणि ट्रॅजेडी किंग दिलीप कुमार यांची पाकिस्तानातील वडिलोपार्जित घरांची खरेदी करण्याचा निर्णय पाकच्या खैबर पख्तनुवा प्रांताच्या सरकारने घेतला असून या घराचे मूल्य निश्चित करण्यात आले आहे. या दोन्ही अभिनेत्यांच्या वडिलोपार्जित घरांच्या इमारती सध्या अतिशय जीर्ण व मोडकळीस आल्या आहेत. त्या ध्वस्त होण्यापूर्वी खैबर पख्तनुवा सरकारने त्या खरेदी करून त्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. पेशावरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या दोन्ही इमारतींना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा सरकारने मोठा निर्णय घेत या दोन्ही घरांचे मूल्य निर्धारित केले आहे. आजतकच्या वृत्तानुसार, दिलीप कुमार यांच्या चार मजली घराची किंमत 80. 56 लाख रूपये निश्चित करण्यात आली आहे तर राज कपूर यांच्या वडिलोपार्जित घरासाठी 1.5 कोटी रूपये इतकी किंमत निर्धारित करण्यात आली आहे. कम्युनिकेशन अँड वर्क्स डिपार्टमेंटने दिलेल्या अहवालानंतर पेशावरचे उपायुक्त मोहम्मद अली असगर यांनी दोन्ही घरांचे मूल्य निर्धारित केले आहे.

फाळणीपूर्वी पाकिस्तानच्या याच घरांमध्ये राज कपूर आणि दिलीप कुमार या ख्यातनाम अभिनेत्यांचा जन्म झाला होता.  राज कपूर यांचे वडिलोपार्जित घर  पेशावरच्या किस्सा खवानी बाजारात आहे. हे घर राज कपूर यांचे आजोबा दीवान बासेश्वरनाथ कपूर यांनी उभारले होते. राज कपूर यांनी त्यांचे बालपण याच घरात घालवले होते.

दिलीप कुमार ज्या घरात जन्मले, त्या घराची 100 वर्षे जुनी वास्तूही याच परिसरात आहे. 2014 साली नवाज शरीफ यांच्या सरकारने हे घर राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केले होते. पेशावरमध्ये अशा स्वरूपाच्या 1800 ऐतिहासिक इमारती असून त्यापैकी अनेक इमारती 300 वर्षे जुन्या आहेत.

टॅग्स :राज कपूरदिलीप कुमारपाकिस्तान