Join us

राज कपूर यांचे घर सोडून चार महिने हॉटेलमध्ये राहिल्या होत्या कृष्णा कपूर! हे होते कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 12:07 PM

बॉलिवूडचे शोमॅन दिवंगत राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचे आज सोमवारी पहाटे निधन झाले. राज कपूर आणि कृष्णा यांची लव्हस्टोरी चांगलीच इंटरेस्टिंग आहे.

बॉलिवूडचे शोमॅन दिवंगत राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर यांचे आज सोमवारी पहाटे निधन झाले. राज कपूर आणि कृष्णा यांची लव्हस्टोरी चांगलीच इंटरेस्टिंग आहे.सन १९४६ मध्ये राज कपूर आणि कृष्णा यांचे लग्न झाले. त्यापूर्वी वर्षभर दोघेही एकमेकांना भेटत होते. त्यांची पहिली भेट कुठल्या फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नव्हती.

एका मुलाखतीत कृष्णा यांची मुलगी रिमा जैन यांनी याबद्दल सांगितले होते. राज कपूर यांना पांढरा रंग कमालीचा आवडायचा. पांढऱ्या रंगाच्या वस्त्रातील महिलांप्रती त्यांच्या मनात कायम एक गूढ आकर्षण राहिले. रिमा जैन हिने याबद्दल मुलाखतीत सांगितले होते. राज कपूर अभिनेते प्रेमनाथ यांच्यासोबत (दिवंगत अभिनेते प्रेमनाथ कृष्णा यांचे भाऊ होते.) पहिल्यांदा कृष्णा यांना पाहायला गेले, तेव्हा केसांत मोगरा माळलेली एक पांढ-या शुभ्र साडीतील तरूणी सतार वाजवतांना खिडकीतून त्यांना दिसली. ही तरूणी म्हणजेच कृष्णा होत्या. कृष्णा यांना पाहून जणू साक्षात सरस्वती पृथ्वीवर अवतरल्याचा भास राज कपूर यांना झाला. ही छबी यानंतर कायम राज कपूर यांच्या मनात रूतून बसली. पुढे राज कपूर यांच्या अनेक चित्रपटांत याचे प्रतिबिंब उमटले. कृष्णा या कायम पांढरी साडी नेसायच्या आणि केसांत फुल माळायच्या.

वर्षभर एकमेकांना समजून घेतल्यानंतर कृष्णा व राज कपूर यांचे लग्न झाले. पण या लग्नात अशी एक घटना झाली, ज्यामुळे राज कपूर नाराज झालेत. या लग्नात त्यावेळचे लोकप्रीय अभिनेते अशोक कुमारही पोहोचले होते. कृष्णा अशोक कुमार यांच्या खूप मोठ्या फॅन होत्या. इतक्या की, स्टेजवर राज कपूर यांच्यासोबत उभ्या असून त्या अशोक कुमार यांची एक झलक पाहण्यासाठी उतावीळ झाल्या होत्या. अशोक कुमार यांच्याबद्दलचे हे प्रेम पाहून राज कपूर नाराज झाले. त्याक्षणी स्वत:ला एक दिवस सर्वोत्तम अभिनेता म्हणून सिद्ध करण्याचा निश्चय त्यांनी केला होता.

१९४८ साली राज कपूर यांनी दिग्दर्शनात डेब्यू करत ‘आग’ हा चित्रपट बनवला. या चित्रपटाने राज कपूर आणि कृष्णा यांच्यात मतभेद निर्माण केले. या चित्रपटाच्या सेटवर राज कपूर आणि नरगिस यांच्यात जवळीक निर्माण झाली. १९५७ मध्ये नरगिस व राज कपूर वेगळे झाले. नरगिसपासून वेगळे झाल्यावर वैजयंतीमाला यांचे नाव राज कपूर यांच्याशी जुळले. राज कपूर यांच्या या स्वभावामुळे कृष्णा कपूर घर सोडून गेल्या होत्या व साडे चार महिने मुंबईच्या नजराज हॉटेलमध्ये राहिल्या होत्या. राज कपूर यांनी खूप समजवल्यानंतर कृष्णा एका अटीवर घरी परतण्यास तयार झाल्या. ती अट म्हणजे, वैजयंतीमाला यांच्यासोबत कधीच काम न करण्याची. यानंतर राज कपूर व वैजयंतीमाला यांनी कधीच एकत्र काम केले नाही. १९६८ मध्ये वैजयंतीमाला यांनी चमनलाल बाली यांच्याशी लग्न केले.

टॅग्स :राज कपूरनर्गिस