राज कपूरने राज बागेत घडविला इतिहास
- राजा माने
मेरा नाम जोकरसारख्या जबरदस्त कलाकृतीने व्यावसायिक आघाडीवर राज कपूरचा भ्रमनिरास झाला होता. पण १९७०च्या दशकातील यंगिस्तानची अचूक नस त्याच्या "बॉबी"ने पकडली आणि आर.के.बॅनरने बॉलिवूड मध्ये इतिहास घडविला. शोमन राज कपूर हे भारतीय सिनेमाच्या हिरेजडित पान! या पानावरील अनेक सुवर्णनोंदीची साक्षीदार बनली ती पुणे-सोलापूर मार्गावरील लोणी येथील "राजबाग" !
बॉबी असो वा सत्यम शिवम,१९७०नंतरच्या राज कपूरच्या प्रत्येक सिनेमाची जडणघडण राजबागेतच झाली. १४ डिसेंबर हा राज कपूर यांचा जयंती दिन! त्याच निमित्ताने राजबागेचीही आठवण झाली. राजला मिसरूडही फुटलेले नसेल तेव्हा त्याचे वडिल पृथ्वीराज कपूर यांनी त्याला सिनेमाचे धडे घ्यायला कोल्हापुरात चित्रतपस्वी बाबा भालजी पेंढारकरांच्या तालमीत धाडले.
भालजींच्या प्रतिभेने भारावलेल्या एकदा तर त्यांच्यापुढे अक्षरशः साष्टांग लोटांगण घातले होते. अशा कलासंस्कारात वाढलेल्या राज यांनी आपल्या प्रत्येक सिनेमाची नाळ हळव्या भारतीय मनाशी अपसुकपणे घट्ट जोडली. त्या घटना घडामोडी राजबागेत घडल्या. घोड्यांच्या रेसचा शौक जतन करताना पुण्याच्या रेसकोर्सवर एक पारशी मित्र झाला होता. त्या मित्राच्या आग्रहामुळे एका पारशी महिलेची लोणी येथील ११५ एकर जमीन त्यावरील बंगल्यासह १९६०च्या दशकात विकत घेतली आणि पुढे हेच स्थळ राजबाग म्हणून नावारुपास आले.
आज एम.आय.टी चे संस्थापक डॉ.वि.दा. कराड,डॉ.राहुल कराड आणि डॉ.मंगेश कराड यांच्याकडे राजबागेची मालकी व पालकत्व आहे.लाखो स्क्वेअर फुटांच्या बांधकामाने नटलेल्या इमारती येथे आहेत.विश्वशांतीचा संदेश देणारा जगातील सर्वात मोठा "डोम" देखिल येथे आहे.पण त्यात राज कपूर यांच्या स्मृती जिवंत ठेवण्याचे काम डॉ. मंगेश कराड आणि कराड परिवाराने केले आहे,हे उल्लेखनीय!
राज कपूर यांचा बंगला त्यांनी म्युजियमरूपाने जतन करण्यात आला आहे. ज्या खोलीत गाणी असो वा पटकथा वा चित्रीकरण मूल्य त्या खोलीपासून ते राज कपूर ज्या खोलीत जमिनीवर झोपायचे त्याखोलीपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीतील " राज कपूर टच" डॉ.मंगेश कराड यांनी श्रद्धेने जतन केला आहे. त्यांच्या बेडरूममध्ये ते जमिनीवर झोपलेल्या अवस्थेतील राज कपूर यांचा पुतळा हा तर विशेष लक्षवेधी ठरतो.
राज कपूर यांच्या कलाप्रेमाला अभिवादन म्हणून या विद्यापीठात कोणत्याही शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला कला या विषयाचा अभ्यास करणे अनिवार्य असल्याचे डॉ मंगेश कराड सांगतात.आपल्या प्रत्येक कलाकृतीने सर्व स्तरातील भारतीय माणसाच्या संवेदनशील मनाचा तळ गाठणाऱ्या "शोमन"राज कपूर यांना आदरांजली.
(लेखक " लोकमत"चे राजकीय संपादक आहेत)