बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर यांचे चित्रपट आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत. त्यांच्या ख-या आयुष्यातले किस्सेही असेच. आजही सिनेप्रेमी हे किस्से जाणून घ्यायला उत्सुक असतात. असाच एक इंटरेस्टिंग किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. राज कपूर यांची मुलगी रितू नंदा हिने लिहिलेल्या ‘राज कपूर’ या पुस्तकातील हा किस्सा आहे. होय, रितु नंदा हिने आपल्या वडिलांबद्दलचे अनेक रंजक किस्से यात लिहिले आहेत. यातला एक म्हणजे, राज कपूर त्यांच्या घरी पाहुणी म्हणून आलेल्या महिलेचा.
त्यावेळी राज कपूर आपल्या आई-वडिलांसोबत मुंबई व कोलकाता अशा दोन्ही ठिकाणी राहत. एकदा राज कपूर यांच्या घरी काही पाहुणे आलेत. पाहुणे येणार म्हणून राज कपूर शाळेला बुट्टी मारून घरी पोहोचले. आज शाळा लवकर सुटली, असे घरी आल्यावर त्यांनी सगळ्यांना सांगितले. घरी आलेल्या पाहुण्यांमध्ये एक महिला होती. पाहताच क्षणी राज कपूर त्या पाहुणी आलेल्या महिलेच्या प्रेमात पडले. यानंतर दिवसभर ते तिच्या मागेपुढे फिरत राहिले. ती पाहुणी परत निघाली तेव्हा राज कपूर यांनी आपल्या बगीच्यातील काही फुले तिला भेट दिलीत. या पाहुणीला राज कपूर त्यानंतर पुन्हा कधीही भेटले नाहीत. पण ते तिला कधीही विसरू शकले नाहीत.
राज कपूर यांनी वयाच्या 11 व्या वर्षी बाल कलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली. 1935 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इन्कलाब’ या चित्रपटात ते बालकलाकार म्हणून झळकले होते.
1947 साली प्रदर्शित ‘नीलकमल’ हा त्यांचा पहिला चित्रपट. 1952 मध्ये प्रदर्शित ‘आवारा’ या चित्रपटाने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली.