Raj Kundra Pornography Case: गेल्या काही महिन्यांत अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilp Shetty) बराच मनस्ताप भोगला. पती राज कुंद्रा (Raj Kundra ) पोर्नोग्राफी प्रकरणी तुरूंगात गेला आणि या काळात शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाली. यामुळे काही दिवस तिला कामही थांबवावं लागलं. यादरम्यान पतीला जामीन मिळाला आणि शिल्पाने सुटकेचा नि:श्वास सोडला. आताश: ती कामावर पतरली आहे. पण राज कुंद्रा तुरुंगातून सुटल्यापासून ‘मौनात’ होता. पण आता त्यानेही पहिल्यांदा अधिकृत स्टेटमेंट जारी करत, पोर्नोग्राफी प्रकरणी मौन सोडलं आहे. ‘मी शांत आहे याचा अर्थ मी दुबळा आहे, असा नाही. मी या खटल्यास सामोरे जाण्यास तयार आहे. माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. शेवटी सत्याचाच विजय होईल,’ असं राज कुंद्राने त्याच्या निवेदनात म्हटलं आहे.
काय म्हणाला राज कुंद्रा...‘माझ्याबद्दलची भ्रामक आणि बेजबाबदार वक्तव्ये आणि अनेक बातम्यांवर मी गप्प आहे आणि यामुळे मला दुबळं मानलं जातंय, असं दीर्घ चिंतनानंतर मला जाणवलं. मी सांगू इच्छितो की, मी माझ्या आयुष्यात कधीही ‘पोर्नोग्राफी’ प्रॉडक्शन वा डिस्ट्रिब्युशनमध्ये सामील झालेलो नाही. हे संपूर्ण प्रकरण दुसरं तिसरं काहीही नसून मला बदनाम करण्याचा कट आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे मी यावर फार बोलू शकत नाही. पण मी खटल्याला सामोरे जायला तयार आहे आणि माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. तिथे अंतिमत: सत्याचाच विजय होतो. दुर्देवाने मीडिया व माझ्या कुटुंबाने मला आधीच दोषी ठरवलं आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून मला विविध प्रकारचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
विविध स्तरावर माझ्या मानवी आणि घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन केलं जात आहे. ट्रोलिंग आणि नकारात्मकता पसरवून माझ्याबद्दल समाजात द्वेष पसरवला जात आहे. पण येथून पुढे माध्यमांकडून सुरू असलेलं मीडिया ट्रायल बंद करावं आणि माझ्या गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन होऊ नये, अशी आशा आहे.
माझं कुटुंब माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. सध्यातरी इतर सर्व गोष्टी माझ्यासाठी गौण आहेत. मला विश्वास आहे की, घटनेनं प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे माझा हा अधिकार अबाधित राहावा, अशी इच्छा आहे,’ असंही राज कुंद्रान जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
गेल्या 19 जुलै रोजी राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. दोन महिन्यांनंतर मुंबई न्यायालयाने राजला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. जामिनावर सुटल्यापासून राज सोशल मीडियापासून दूर आहे. त्याने त्याचे सोशल अकाऊंट्ससुद्धा डिलीट केले आहेत.