शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्राच्या पहिल्या पत्नीचे नाव कविता कुंद्रा होते. 2006 च्या दरम्यान राज आणि कविता यांच्यात सतत वाद होत असल्याने त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. कविताने त्यांच्या घटस्फोटाविषयी शिल्पावर अनेक आरोप लावले होते. राज आणि कविता यांच्या घटस्फोटासाठी केवळ शिल्पा जबाबदार असल्याचे तिने म्हटले होते. राज आणि शिल्पा यांची एका परफ्यूमच्या प्रमोशनच्या निमित्ताने भेट झाली होती. त्यानंतर ते दोघे बिझनेस पार्टनर बनले. त्यानंतर शिल्पा आणि राजच्या प्रेमकथेची चर्चा लगेचच मीडियात सुरू झाली होती. त्याचदरम्यान कविताला राजने घटस्फोटाची नोटिस दिली होती. त्यावेळी त्यांची मुलगी डेलिना ही केवळ काहीच महिन्यांची होती. राज आणि कविता यांचा घटस्फोट झाल्यानंतर काहीच महिन्यात शिल्पा आणि राज यांनी लग्न केले होते. पण या आरोपांवर आता राजने उत्तर दिले आहे.
पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार राज कुंद्राने कवितांवरील आरोपांवर उत्तर दिले आहे. तो म्हणाला की, कविता खूप विक्षिप्त आहे. माझी फॅमिली माझ्यासाठी सर्वकाही आहे. मात्र ती माझ्या कुटुंबाला त्रास देत होती. माझे आई-वडील, बहिण आणि तिचा पती आम्ही युरोपमध्ये असताना एकाच घरात राहात होतो. त्यावेळी तिने माझ्या बहिणीच्या नवऱ्यासोबत खूपच जवळीक वाढवली होती. ती त्याच्यासोबतच जास्त वेळ घालवायची. मला सतत टाळायची. मी तिच्याशी या प्रकरणावर जेव्हा कधी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. माझ्या ड्रायव्हरने देखील त्या दोघांना अनेकदा एकत्र पाहिले होते.”
शिल्पा शेट्टीने बाजीगर या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पहिल्याच चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. तिने त्यानंतर एकाहून एक हिट चित्रपट दिले. तिने धडकन, रिश्ते, गर्व, मैं खिलाडी तू अनाडी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने मोठ्या पडद्यानंतर छोट्या पडद्यावर देखील तिचे प्रस्थ निर्माण केले आहे. सुपर डान्सरमधील सुपर से उपर बोलण्याची तिची अदा प्रेक्षकांना प्रचंड आवडते.