ही गोष्ट आहे त्या दिवसांची ज्यावेळी राजेश खन्ना सुपरस्टार होते. त्यावेळी ते अभिनेता राजेंद्र कुमार यांचा बंगला विकत घ्यायचा होता. मात्र राजेंद्र कुमार त्यासाठी तयार नव्हते. एकवेळ अशी आली की शेवटी राजेंद्र कुमार यांना बंगला विकण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यांनी राजेश खन्ना यांच्यासमोर एक अट ठेवली की ते बंगला सात लाख रुपयांना विकणार आणि पूर्ण रक्कम एकदाच घेणार. त्यावेळी ७ लाख रुपये ही खूप मोठी रक्कम होती. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याकडे तेवढे पैसेदेखील नव्हते.
त्यावेळी राजेश खन्ना यांनी निर्णय घेतला की जो चित्रपट निर्माता चित्रपट घेऊन त्यांच्याकडे येणार सात लाख रुपये मानधन घेऊन तो चित्रपट लगेच साईन करणार. तसेच चित्रपटाच्या कथा व स्क्रीप्टवर देखील लक्ष देणार नाही.
दुसऱ्याच दिवशी एक निर्माते आले आणि राजेश खन्ना यांना कथा ऐकविली. स्क्रीप्ट सांगितली. राजेश खन्ना यांना ती स्क्रीप्ट अजिबात आवडली नव्हती. मात्र त्यांनी निर्मात्यांसमोर अट ठेवली की सात लाख रुपये देणार तरच चित्रपट साईन करेन. निर्मात्याने लगेच होकार दिला. सात लाख रुपये जमवून राजेश खन्नाला दिले होते. त्याबदल्यात राजेश खन्ना यांनी त्यांना हवे त्या तारखा शूटसाठी दिल्या. अशाप्रकारे त्यांनी तो बंगला विकत घेतला होता.
बंगला विकत घेतल्यानंतर राजेश खन्ना स्क्रीप्ट घेऊन लेखक सलीम-जावेद यांच्या घरी गेले आणि त्यांना स्क्रीप्टमध्ये बदल करायला सांगितली.
स्क्रीप्टमध्ये बदल केला. या चित्रपटाचं नाव आहे हाथी मेरे साथी. या चित्रपटाचे दिग्दर्शन एम. ए. थिरूमुगम यांनी केले होते. हा चित्रपट १९७१मध्ये प्रदर्शित झाला आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करून कायम आहे.