हृषीकेश मुखर्जी यांचा 1972 मध्ये आलेला बावर्ची सिनेमा लोकांना खूप आवडला होता. या चित्रपटात राजेश खन्ना आणि जया बच्चन मुख्य भूमिकेत दिसले होते. मात्र या चित्रपटाच्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा अपमान करण्यात आला होता. ज्याचे मुख्य कारण होते राजेश खन्ना.
राजेश खन्ना व जया बच्चन ‘बावर्ची’ या सिनेमाचे शूटींग करत होते. त्याच काळात जया व अमिताभ यांच्या अफेअरच्या चर्चाही जोरात होती. अमिताभ फार काही मोठे स्टार बनले नव्हते. राजेश खन्नांच्या समोर तर काहीच नव्हते. पण ‘बावर्ची’मध्ये अमिताभ यांना केवळ नरेटर म्हणून घेतलं होतं. म्हणजे अमिताभ यांचा केवळ आवाज. यात जया बच्चन राजेश खन्ना यांची हिरोईन होती. असे म्हणतात की, या शूटींगच्या सेटवर राजेश खन्ना अमिताभ व जया यांच्या अफेअरवरून मनात येईल ते बोलायचे. जया यांच्यासमोर जाणीवपूर्वक अमिताभ यांची खिल्ली उडवायचे.
एक दिवस जसे अमिताभ बच्चन सेटवर आले राजेश खन्ना यांनी काहीतरी कमेंट केली. जी अमिताभ यांनी ऐकली नाही. पण जया यांनी ऐकली होती. बॉलिवूडमध्ये चर्चा होती की, काकांनी त्यावेळी अमिताभ यांना ‘आ गया मनहूस’ असं म्हटलं होतं. जया यावरून जाम भडकल्या होत्या. इतक्या की रागा रागात त्या असं काही बोलून गेल्या की, सगळेच थक्क झाले होते. ‘एक दिन जमाना देखेगा की ये (अमिताभ बच्चन) कहां होंगे और आप कहां रह जाएंगे,’ असं जया म्हणाल्या होत्या.
जया यांच्या तोंडचे हे शब्द पुढे एकदम खरे ठरले. अमिताभ बच्चन यांना ‘अँग्री यंग मॅन’च्या रूपात लोकांनी डोक्यावर घेतले आणि याऊलट राजेश खन्ना यांची चमक फिकी पडत गेली. ‘बावर्ची’च्या नंतर ‘नमक हराम’ रिलीज झाला. यात राजेश खन्ना, रेखासोबत अमिताभ बच्चन दिसले आणि अमिताभ यांची जोरदार चर्चा झाली. राजेश खन्ना असूनही या चित्रपटाचे सगळे श्रेय अमिताभ यांच्या खात्यावर जमा झाले.