रजनीकांत यांना भारतीय सिनेमाचा सर्वाधिक मोठे सुपरस्टार म्हटले जाते. याचे कारण या बातमीत तुम्हाला सापडेल. होय, रजनीकांत आणि अक्षय कुमारचा ‘2.0’ आज गुरुवारी रिलीज झालाय, हे तुम्ही जाणताच. पण तो रिलीज होण्याआधी प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला. इतका की, आज पहिला शो सुरू होण्यापूर्वी या चित्रपटाची 1.2 मिलियन म्हणजे 12 लाख तिकिटे विकली गेलीत. केवळ इतकेच नाही तर लोक अगदी वाजत गाजत फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायला पोहोचले.
चाहत्यांनी अख्खी रात्र चित्रपटगृहाबाहेर जागून काढली आणि फर्स्ट शो सुरू होण्यापूर्वी ढोल ताशांच्या गजरात एकच जल्लोष केला. मुंबईत माटुंगा आणि वडाला येथे चाहत्यांची गर्दी दिसली. काही चाहत्यांनी रजनीकांत यांच्या कटआऊटला रथावर बसवून त्यावर पुष्पवृष्टी केली. अनेक ठिकाणी फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली.
जाणकारांचे मानाल तर आज प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच हा चित्रपट 20 ते 25 कोटींची कमाई करू शकतो. अर्थात हा आकडा फक्त हिंदी व्हर्जनच्या कमाईचा आहे. तामिळ आणि तेलगू व्हर्जनच्या कमाईचा विचार केल्यास हा आकडा १०० कोटींच्या घरात जाऊ शकतो.
आता रजनीकांत यांना भारतीय सिनेमाचा सर्वाधिक मोठा सुपरस्टार का म्हणतात, हे एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच. रजनीकांत यांच्या प्रत्येक चित्रपटावर प्रेक्षकांच्या अशाच उड्या पडतात. 2.0 हा चित्रपटही त्याला अपवाद नाही.2.0 हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक महागडा चित्रपट आहे. केवळ चित्रपटाच्या व्हीएफएक्सवर 550 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.