दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यावेळी कोणत्या सिनेमामुळे नाही तर 'मॅन व्हर्सेस वाइल्ड'च्या शूटिंगमुळे चर्चेत आले आहेत. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, रजनीकांत बेयर ग्रिल्स शोमध्ये दिसले होते. डिस्कव्हरी वाहिनीवर प्रसारीत होणाऱ्या शोचे शूटिंग रजनीकांत व ग्रिल्स यांनी मंगळवारी कर्नाटकमधील बांदीपुर टायगर रिझर्व्हमध्ये सुरू केले आहे. आता अशी माहिती मिळते आहे की शूटिंगदरम्यान रजनीकांत यांना दुखापत झाली आहे.
अमर उजालाच्या रिपोर्टनुसार, शूटिंगमध्ये रजनीकांत यांना थोडीफार दुखापत झाली आहे. रजनीकांत व बेयर ग्रिल्स कर्नाटकमधील बांदीपुर वाघ अभयारण्यात शूटिंग करत होते. रजनीकांत यांच्या दुखापतीबद्दल एका वन अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले की, रजनीकांत यांचे संतुलन बिघडले आणि त्यांच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली. त्यांच्या हाताला व कोपरालाही थोडेसे खरचटले.त्यांनी सांगितले की, जास्त खरचटले नाही आणि लवकरच ते ठीक होतील.