Join us

१४ एप्रिलला रिलीज होणार रजनीकांत यांचा ‘२.०’, तर ६ जानेवारीला रिलीज होणार टीजर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 4:20 PM

गेल्या काहीकाळापासून सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘२.०’ हा बहुचर्चित चित्रपट केव्हा रिलीज होईल, असा प्रश्न चाहत्यांमध्ये उपस्थित केला जात होता. ...

गेल्या काहीकाळापासून सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘२.०’ हा बहुचर्चित चित्रपट केव्हा रिलीज होईल, असा प्रश्न चाहत्यांमध्ये उपस्थित केला जात होता. असे म्हटले जात होते की, हा बिग बजेट चित्रपट अक्षयकुमारच्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटाला क्लॅश होईल. मात्र आता तसे होणार नसून, चित्रपटाच्या रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. होय, रजनीकांत आणि अक्षयकुमार स्टारर हा चित्रपट १४ एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. शंकर यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाच्या रिलीजविषयी बराच संभ्रम होता. मात्र आता तारीख निश्चित झाल्याने रजनीकांत यांच्या चाहत्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. या अगोदर रजनीकांत यांनी म्हटले होते की, ‘माझा चित्रपट एप्रिल महिन्यात रिलीज होऊ शकतो.’ दरम्यान, १४ एप्रिल रोजी तामिळ न्यू इअरला सुरुवात होते. अशात या चित्रपटाला तामिळ न्यू इअरमध्ये मिळणाºया सुट्यांचा फायदा होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरापासून या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली जात होती. ज्यामुळे चाहत्यांमध्ये काहीशी निराशा बघावयास मिळत होती. दरम्यान, आता रिलीज डेट निश्चित झाल्याने चाहत्यांचा संभ्रम काहीसा दूर झाला आहे. त्याचबरोबर चित्रपटाचा टीजर ६ जानेवारी रोजी रिलीज होणार असल्याने या चित्रपटातील थराराची त्यातून झलक बघावयास मिळेल. दरम्यान, याबाबतची संपूर्ण माहिती साउथ चित्रपटांचे क्रिटिक आणि ट्रेड एक्सपर्ट श्रीधर पिल्लई यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यासाठी निर्मात्यांनी मलेशिया हे ठिकाण निवडले आहे. या टीजर लॉन्चप्रसंगी रजनीकांतदेखील उपस्थित राहणार आहेत. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी तब्बल ४०० कोटी रूपये इतका खर्च आला आहे. त्यामुळे हा चित्रपट किती कमाई करू शकेल याविषयी संगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.