‘रोबोट २.०’ अगोदर रिलीज होणार रजनीकांत यांचा ‘हा’ चित्रपट!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2017 5:12 PM
२०१७ हे वर्ष भारतीय सुपरस्टार रजनीकांत यांच्याकरिता खूपच धावपळीचे ठरत आहे. कारण त्यांनी अगोदर बिग बजेट साय-फाय चित्रपट ‘रोबोट ...
२०१७ हे वर्ष भारतीय सुपरस्टार रजनीकांत यांच्याकरिता खूपच धावपळीचे ठरत आहे. कारण त्यांनी अगोदर बिग बजेट साय-फाय चित्रपट ‘रोबोट २.०’ पूर्ण केला, त्यानंतर लगेचच त्यांनी ‘काला कालीकरन’ची शूटिंग सुरू केली. एका वर्षात तब्बल दोन चित्रपटांमध्ये व्यस्त असल्याने, त्यांची धावपळ होत असली तरी त्यांच्या चाहत्यांना लागोपाठ दोन चित्रपटांची मेजवानी मिळेल, असे म्हणावे लागेल. पा. रंजीथ दिग्दर्शित ‘काला’साठी सध्या रजनी मुंबईत आहेत. धारावीच्या झोपडपट्टीत ते या चित्रपटाची शूटिंग करीत आहेत. तर त्यांचा ‘रोबोट २.०’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झालेली आहे; मात्र अशातही ‘काला’ हा चित्रपट ‘रोबोट २.०’ अगोदर रिलीज केला जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ‘रोबोट २.०’ केव्हा रिलीज करायचा याविषयी निर्मात्यांमध्ये अजूनही गोंधळ असल्याचे दिसून येते. त्यामुळे ‘काला’ हा चित्रपट ‘रोबोट २.०’ अगोदरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, पा. रंजीथ यांच्या ‘काला’ची शूटिंग आॅक्टोबर महिन्यापर्यंत संपेल. त्यानंतर हा चित्रपट डिसेंबरमध्ये रिलीज केला जाईल. डिसेंबरमध्ये रिलीज करण्याचे प्रमुख कारण म्हणजे याच महिन्यात रजनीकांत यांचा जन्मदिवस आहे. ही संधी साधून निर्मार्त्यांकडून हा चित्रपट डिसेंबरमध्ये रिलीज करण्याची शक्यता आहे. जर असे घडले तर रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी रजनी यांचे बॅक टू बॅक दोन चित्रपट बघावयास मिळणार आहेत. कारण रजनीकांत आणि अक्षयकुमार स्टारर ‘रोबोट २.०’ हा चित्रपट जानेवारी २०१८ मध्ये रिलीज केला जाण्याची शक्यता आहे. असो, रजनीकांत यांच्या १६४ व्या ‘काला’च्या शूटिंगचे पहिले शेड्यूल संपले आहे. या चित्रपटात रजनीकांत एका तामिळ डॉनच्या भूमिकेत बघावयास मिळणार आहेत. चित्रपटात रजनी यांच्याबरोबर अभिनेत्री हुमा कुरेशी, नाना पाटेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. शूटिंगदरम्यान चित्रपटाला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असून, हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर करिष्मा करेल असेच काहीसे चित्र बघावयास मिळत आहे. चित्रपटाच्या शूटिंगचे दुसरे शेड्यूल चेन्नई येथे सुरू केले जाणार आहे.