रजनीकांतसोबत केवळ पोस्टरमध्ये झळकल्याने कुत्र्याची वाढली डिमांड; दोन कोटींची आॅफर!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2018 1:22 PM
सुपरस्टार रजनीकांत यांच्या सहवासात कोणीही आले तरी त्याची डिमांड वाढते. असेच काहीसे या कुत्र्यासोबत घडताना दिसत आहे. त्याला खरेदी करण्यासाठी तब्बल दोन कोटी रुपयांची आॅफर आली आहे.
सुपरस्टार रजनीकांत यांच्याबद्दल ज्या काही दंतकथा पसरविल्या जातात त्यातील बहुतांश दंतकथा त्यांच्या आयुष्याशी निगडित असतात असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. आता हेच पाहा ना, रजनीकांत यांच्या आगामी ‘काला’ या चित्रपटाचे एक पोस्टर रिलीज करण्यात आले असून, पोस्टरमध्ये त्यांच्यासोबत एक कुत्रा दिसत आहे. आता तुम्ही म्हणाल की यात नवे काय? पण तुम्हाला माहिती आहे काय की, रजनीकांत यांच्या चाहत्यांनी हा कुत्रा चक्क दोन कोटी रूपयांमध्ये मागितला आहे. होय, या कुत्राचे नाव मणी असून, टाइम्सच्या एक रिपोर्टनुसार प्रोफेशनल डॉग ट्रेनर सिमोनने सांगितले की, मला मलेशियापासून हा कुत्रा विकत घेण्यासाठीच्या आॅफर्स येत आहेत. सिमोनने म्हटले की, ‘काही लोकांनी तर मणीला खरेदी करण्यासाठी चक्क दोन कोटी रुपयांची आॅफर दिली आहे. केवळ या कुत्र्यासोबत रजनीकांत दिसत असल्यामुळेच लोक त्यास एवढी रक्कम देण्यास तयार आहेत. मात्र मी त्यास विकण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. कारण आम्ही सर्वच त्याचा एखाद्या लहान मुलाप्रमाणे सांभाळ करतो.’सिमोनने सांगितले की, कोणी आपल्या मुलाची अशाप्रकारे बोली लावतो काय? यामुळेच मी या सर्व आॅफर्स फेटाळून लावल्या. सिमोनने रजनीकांत आणि मणी यांच्यात असलेल्या नात्याविषयीदेखील सांगितले. सिमोनने म्हटले की, ‘रजनी सर त्याला रोज एक पॅकेट बिस्कीट खाऊ घालतात. यामुळे ट्रेनर्सचे काम सोपे होते. रजनीसर आणि मणी यांच्यात खूपच चांगले नाते आहे. तुमच्या माहितीसाठी रजनीकांत यांनी गेल्या मंगळवारीच फेसबुकवर डेब्यू केला. रजनीकांत यांना दक्षिण भारतात एखाद्या देवाप्रमाणे पुजतात. त्यांचा कुठलाही चित्रपट असो, चाहते त्याला सुपरडुपर हिटचा दर्जा मिळवून देतात. दरम्यान, रजनीकांत यांचा ‘काला’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. याव्यतिरिक्त अक्षयकुमारसोबतचा त्यांचा ‘२.०’ हा चित्रपटदेखील प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. ‘२.०’ हा चित्रपट एप्रिल महिन्यातच प्रदर्शित होणार होता; परंतु ‘काला’च्या प्रदर्शनामुळे त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. ‘२.०’ या सायन्स फिक्शन चित्रपटात पहिल्यांदाच अक्षयकुमार निगेटिव्ह भूमिकेत बघावयास मिळणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि टीजर अद्यापपर्यंत प्रदर्शित केला नाही. मात्र जे मेकिंग व्हिडीओ समोर आले आहेत, ते बघून प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दलची उत्सुकता खूपच वाढली आहे.