ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ आणि ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. त्याच्या कुटुंबियांना त्यांच्या निधनामुळे चांगलाच धक्का बसला आहे. राजीव सकाळपर्यंत अगदी व्यवस्थित होते. त्यांनी सकाळचा नाश्ता केला. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटायला लागले आणि त्यातच त्यांना हृदय विकाराचा झटका आला.
राजीव कपूर यांच्या निधनामुळे त्यांचे मोठे बंधू रणधीर कपूर यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. त्यांनी सांगितले की, डॉक्टरांनी राजीवला वाचवण्याचे अनेक प्रयत्न केले. पण ते त्याला वाचवू शकले नाही. आज मी माझ्या सगळ्यात लहान भावाला गमावले.
रणधीर यांच्या मुली करिश्मा आणि करिना यांना देखील काकाच्या निधनामुळे चांगलाच धक्का बसला आहे. करिना आणि करिश्मा यांना त्यांची आई बबिता यांच्यासोबत पाहाण्यात आले. ते राजीव यांच्या घरी जाण्यासाठी निघाले होते.
तसेच राजीव यांची बहीण रिमा जैन यांचा मुलगा आदर जैन देखील अंतिम दर्शनासाठी राजीव यांच्या घरी पोहोचला. तसेच नीतू सिंग, तारा सुतारिया, रणबीर कपूर यांनी देखील राजीव कपूर यांचे अंतिम दर्शन घेतले.
हिंदी चित्रपटसृष्टीवर दीर्घकाळ अधिराज्य गाजवणाऱ्या कपूर कुटुंबाबद्दल प्रत्येकजण जाणतो. पृथ्वीराज कपूर यांनी या साम्राज्याचा पाया रचला. पुढे त्यांची मुले राज कपूर, शम्मी कपूर , शशी कपूर यांनी हा वारसा पुढे देत बॉलिवूडमध्ये अढळ स्थान निर्माण केले. राज कपूर तर बॉलिवूडचे शो मॅन ठरले. पुढे राज कपूर यांची मुले रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि काही प्रमाणात राजीव कपूर यांनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेला. रणधीर आणि ऋषी कपूर बरेच पुढे निघून गेले. पण राजीव कपूर यांना मात्र आपल्या भावंडांच्या तुलनेत फार यश मिळू शकले नाही.
‘ एक जान है हम’ या चित्रपटाद्वारे राजीव यांनी त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पण हा चित्रपट आपटला. त्यामुळे ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाद्वारे राज कपूर यांनी मुलाला पुन्हा लाँच करण्याचे ठरवले. हा चित्रपट प्रचंड गाजला. सुपरडुपर हिट झाला. पण राजीव कपूरमुळे नाही तर मंदाकिनीच्या एका सीनमुळे. होय, धबधब्याखाली मंदाकिनीने दिलेला या चित्रपटातील एक सीन चांगलाच चर्चेत राहिला होता.
राम तेरी गंगा मैली नंतर राजीव कपूर यांनी लव्हर बॉय, अंगारे, जलजला, हम तो चले परदेस अशा चित्रपटात काम केले. पण या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यश मिळाले नाही.