Join us

या अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते राजीव कपूर, पण अधुरी राहिली प्रेमकथा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 5:15 PM

राजीव कपूर यांची प्रेमकथा अपूर्ण राहिल्यानंतर त्यांनी २००१ मध्ये लग्न केले होते. पण त्यांचे हे लग्न केवळ दोन वर्षं टिकले.

ठळक मुद्देराजीव कपूर आणि प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांच्या अफेअरची त्याकाळात चांगलीच चर्चा रंगली होती. राजीव कपूर यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.

ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ आणि ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या निधनामुळे चांगलाच धक्का बसला आहे. राजीव सकाळपर्यंत अगदी व्यवस्थित होते. त्यांनी सकाळचा नाश्ता केला. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटायला लागले आणि त्यातच त्यांना हृदय विकाराचा झटका आला.

राजीव कपूर यांनी एक जान है हम या चित्रपटाद्वारे कारकिर्दीला सुरुवात केली. पण हा चित्रपट आपटला. त्यामुळे ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटाद्वारे राज कपूर यांनी मुलाला पुन्हा लाँच करण्याचे ठरवले. हा चित्रपट प्रचंड गाजला. सुपरडुपर हिट झाला. पण राजीव कपूरमुळे नाही तर मंदाकिनीच्या एका सीनमुळे. होय, धबधब्याखाली मंदाकिनीने दिलेला या चित्रपटातील एक सीन चांगलाच चर्चेत राहिला होता. राम तेरी गंगा मैली नंतर राजीव कपूर यांनी लव्हर बॉय, अंगारे, जलजला, हम तो चले परदेस अशा चित्रपटात काम केले. पण या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर यश मिळाले नाही.

राजीव कपूर आणि प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांच्या अफेअरची त्याकाळात चांगलीच चर्चा रंगली होती. राजीव कपूर यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. आर. के. बॅनरच्या बिवी ओ बिवी या चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शक राहुल रवैल यांना सगळ्यात पहिल्यांदा असिस्ट केले होते. त्यानंतर त्यांनी त्यांचे वडील राज कपूर यांना अनेक चित्रपटांसाठी असिस्ट केले. राज कपूर यांनी प्रेमरोग या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात ऋषी कपूर आणि पद्मिनी कोल्हापूरे मुख्य भूमिकेत होते. त्याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान राजीव पद्मिनी यांच्या प्रेमात पडले होते. चित्रीकरणाच्या ब्रेकदरम्यान राजीव अनेकवेळा पद्मिनी यांच्या मेकअप रूममध्येच बसत असत. ही बातमी त्याकाळात अनेक मासिकांमध्ये छापून आली होती. राज कपूर यांना ही गोष्ट कळल्यानंतर ते प्रचंड चिडले होते. पद्मिनी यांना त्यांनी सांगितले होते की, या चित्रपटात काम करायचे असेल तर त्यांना राजीव यांच्यापासून दूर राहावे लागेल अथवा त्यांना हा चित्रपट सोडावा लागेल. राज कपूर चिडल्यामुळेच राजीव आणि पद्मिनी यांच्या नात्याला तिथेच पूर्णविराम मिळाला.

राजीव यांनी आर्किटेक्ट आरती सब्रवालसोबत २००१ मध्ये लग्न केले होते. त्या दोघांचा प्रेमविवाह होता. दोन वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण लग्नाच्या दोनच वर्षांत त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आरती या मुळच्या कॅनडाच्या होत्या. 

टॅग्स :राजीव कपूर