‘3 इडियट्स’ आणि ‘संजू’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांची मलेशिया इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे ज्युरी हेड म्हणून निवड झाली आहे. मलेशिया गोल्डन ग्लोब अवार्ड्सच्या तिसºया पर्वाची सुरुवात लवकरच होणार आहे. येत्या २० जुलैला हा सोहळा रंगणार आहे.राजकुमार हिरानी यांच्याशिवाय ज्युरींमध्ये साऊथ कोरियन सिनेमेटोग्राफर किम ह्युंग कूल, हाँगकाँगची अभिनेत्री सेसेलिया यिप, इंडोनेशियन दिग्दर्शक जोको अनवर आणि मलेशियाचे दिग्दर्शक हो युहांग यांचा समावेश आहे.
सन २०१७ मध्ये मलेशिया फिल्म फेस्टिवलची सुरुवात झाली होती. मलेशियन पे्रक्षकांना आतरराष्ट्रीय सिनेमाची ओळख करून देणे आणि देशात चित्रपट उद्योगाला चालना देणे, हा या फेस्टिवलचा उद्देश होता. याचाच परिणाम म्हणजे, २०१८ मध्ये मलेशियन फिल्म मेकर सॅम्युअल युसूफ याच्या ‘मुनाफिक 2’ने सर्वाधिक कमाई केली होती.
राजकुमार हिरानी यांनी त्यांच्या कारकिर्दीत सगळेच हिट चित्रपट दिले आहेत. एकही फ्लॉप चित्रपट दिलेला नसल्याने एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. राजकुमार हिरानी यांनी त्यांच्या कारकिर्दीत मुन्नाभाई एमबीबीएस, लगे रहो मुन्नाभाई, थ्री इडियट्स, पीके, संजू यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.