ठळक मुद्देसमी सिद्धू आज एका हाऊसिंग सोसायटीत सिक्युरिटी गार्डचे काम करतात. आज ते एकटे आहेत.
पटियाला हाऊस, बेवकूफियाँ, गुलाल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते सवी सिद्धू यांना मुंबईच्या मलाडमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत आहेत. काल ही बातमी माध्यमांत झळकली आणि क्षणात व्हायरल झाली. पाठोपाठ सवी सिद्धूंच्या मदतीसाठी राजकुमार राव सारखा अभिनेता समोर आला. तर दिग्दर्शक अनुराग कश्यपने यानिमित्ताने बॉलिवूडमधील वास्तव अधोरेखीत केले.राजकुमार रावने सवी सिद्धू यांच्या जिद्दीला सलाम करत, ट्विटरवर एक भावूक पोस्ट लिहिली. ‘सवी सिद्धू सर, तुमची कथा खरोखरच प्रेरणादायी आहे. चित्रपटांतील तुमचे काम वाखाणण्यजोगे राहिले. तुमच्या सकारात्मक वृत्तीला सलाम. मी निश्चितपणे माझ्या कास्टिंग मित्रांना तुमची भेट घ्यायला सांगेल,’ असे राजकुमार रावने सांगितले.
अनुराग कश्यप यानेही सवी सिद्धू यांच्या जिद्दीला सलाम करत, इंडस्ट्रीत अशा अनेक कथा असल्याचे लिहिले. ‘चौकीदार असणे एक चांगले काम आहे. मी कुठलेही काम लहान-मोठे असे मानत नाही. चॅरिटी कुठल्याही कलेला वा कलाकाराला तगवू श्कत नाही. सवी सिद्धू सारख्या अनेक कथा या इंडस्ट्रीत आहेत. मी अशा अनेक कलाकारांना मी ओळखतो, ज्यांच्याकडे काम नाही. एक कलाकार या नात्याने मी सवी सिद्धू यांचा आदर करतो. मी त्यांना तिनदा कास्ट केले. आज आपली उपजीविका चालवण्यासाठी त्यांनी निवडलेल्या कामाचाही मी आदर करतो. अनेक कलाकार काम न मिळाल्याने निराश होत दारूच्या व्यसनाला बळी पडत स्वत:चे आयुष्य उद्धवस्त करतात. पण समी सिद्धूंनी असे न करता काम करण्याचा मार्ग निवडला. नवाज हाही एकेकाळी चौकीदार होता. मी स्वत: एकेकाळी वेटरचे काम केले. मी ब्लॅक फ्रायडे व सलमा बॉम्बेच्या कलाकारांना ओळखतो, जे आज रस्त्यांवर भेलपुरी विकत आहेत. रिक्षा चालवत आहेत. तुम्ही अशा कलाकारांची मदत करू इच्छित असाल तर पैसे देऊन चित्रपट पाहणे सुरु करा. असे करून तुम्ही अनेकांना काम देऊ शकता. मला ट्विट करून फायदा नाही. मी नव्या लोकांना काम दिले आहे आणि देत राहणार आहे,’असे अनुरागने लिहिले.
समी सिद्धू आज एका हाऊसिंग सोसायटीत सिक्युरिटी गार्डचे काम करतात. आज ते एकटे आहेत. ‘मला काम मिळाले नाही असे झाले नाही. याउलट माझ्याकडे जास्त काम असल्याने मी काही चित्रपटांना नकार देत होतो. पण माझी तब्येत दिवसेंदिवस ढासळत होती. त्यामुळे काम करणे माझ्यासाठी शक्य नव्हते. याच कारणाने काही काळानंतर मला काम मिळणे बंद झाले आणि त्यामुळे पैशांची चणचण निर्माण झाली. त्यात माज्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर माज्या आई वडिलांचे, सासू सासऱ्यांचे देखील निधन झाले आणि मी एकटा पडलो, असे त्यांनी सांगितले होते.