Join us

Badhaai Do Movie Review : सिनेमा पाहून तुम्हीही म्हणाल,‘बधाई हो’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 10:55 AM

Badhaai Do Movie Review : ‘बधाई हो’ नंतर ‘लॅव्हेंडर मॅरेज’ या संकल्पनेवर आधारित या चित्रपटाचा सीक्वल ‘बधाई दो’ नावाने रिलीज झालाये. जाणून घ्या कसा आहे हा चित्रपट?

कलाकार- राजकुमार राव, भूमी पेडणेकर, सीमा पाहवा, लवलीन मिश्रादिग्दर्शक - हर्षवर्धन कुलकर्णीरेटींग - 3.5

.............................

Badhaai Do Movie Review : ‘बधाई हो’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. वेडिंग थीम, नेहमीपेक्षा हटके विषय आणि कलाकारांचा अप्रतिम अभिनय असा हा सिनेमा प्रत्येक बाबतीत अव्वल ठरला होता. आयुष्यमान खुराणा, नीना गुप्ता व गजराज राव यांची जबरदस्त केमिस्ट्री असलेल्या या सिनेमाने 100 कोटींपेक्षा अधिक कमाई करून सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. शिवाय राष्ट्रीय पुरस्कारावरही नाव कोरलं होतं. ‘बधाई हो’ (Badhaai Do)नंतर या चित्रपटाचा सीक्वल ‘बधाई दो’ नावाने रिलीज झालाये. स्टार कास्ट बदलली आहे. शिवाय सिनेमाची संकल्पनाही बदललीये. राजकुमार राव  (Rajkummar Rao) आणि भूमी पेडणेकरचा  (Bhumi Pednekar) हा सिनेमा एका संवेदनशील विषयाला वाचा फोडतो. ‘लॅव्हेंडर मॅरेज’ या संकल्पनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात अपार कुतूहल आहे.  

अशी आहे कथासुमी (भूमी पेडणेकर) आणि शार्दुल (राजकुमार राव) या समलैंगिक जोडप्याची कहाणी या चित्रपटात बघायला मिळते. उत्तराखंडच्या मध्यवर्गीय कुटुंबातून आलेला शार्दुल पोलिस इन्स्पेक्टर आहे. तर सुमी एक पीटी टीचर. सुमी लेस्बियन  तर शार्दुल गे.  घरातील पारंपरिक वातावरण आणि समाजाचा दबाव यामुळे दोघंही आपली सेक्शुअ‍ॅलिटी जगापासून लपवून ठेवतात. पण दोघांवरही घरच्यांचा लग्नासाठी मोठा दबाव असतो. अशात शार्दुलच्या डोक्यात कल्पना येते. ती म्हणजे लग्नाची. आपण दोघांनी लग्न केलं तर घरच्यांची रोजची कटकट थांबेल, या विचाराने सुमी व शार्दुल तडजोडीचा विवाह करायला राजी होतात. हे लग्न आपल्याला सामाजिक सुरक्षेचं कवच देईल आणि आपण दोघंही आपआपल्या पार्टनरसोबत आनंदी राहू, असा सुमी व शार्दुलचा अंदाज असतो. अर्थातच हा अंदाज फोल ठरतो. तडजोड म्हणून केलेलं हे लग्न त्यांच्यासाठी  चक्रव्युहात अडकलेल्या अभिमन्यूसारखं ठरतं. लग्नाच्या चक्रव्युहात अडकलेल्या या जोडप्याला आपली डुएल पर्सनॅलिटी लपवता लपवता नाकीनऊ येतं. पुढे काय होतं? सरतेशेवटी दोघंही आपलं सत्य समाजाला कसं सांगतात? यासाठी तुम्हाला हा सिनेमा बघावा लागेल.

दिग्दर्शक हर्षवर्धन कुलकर्णी यांनी या सिनेमात समलैंगिक संबंध, लग्न, कुटुंब व्यवस्था, समाजाची मानसिकता या सगळ्यांना एका धाग्यात बांधण्याचा प्रयत्न केला आहे.  समलैंगिकांच्या भावभावनांना अतिशय साध्यासोप्या पद्धतीने दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे.सेक्शुअ‍ॅलिटी लपवताना होणारा मनाचा कोंडमारा सुद्धा तितक्याच प्रभावीपणे दाखवला आहे. सुमी एक बिनधास्त आणि स्वतंत्र विचाराची मुलगी आहे. पण  महिलांना कमी लेखणारा शार्दुलचं एक वेगळं रूप तिच्यासमोर येतं आणि चित्रपट एका वेगळ्या वळणावर जातो. मध्यवर्गीय भारतीय कुटुंबाची मानसिकता आणि या मानसिकतेत अडकलेली सेक्शुअ‍ॅलिटी दिग्दर्शकानं प्रामाणिकपणे मांडलं आहे.

चित्रपटाची सुरूवात काहीशी संथ आहे. चित्रपटाचा प्लॉट तयार करण्यासाठी दिग्दर्शकाने बराच वेळ घेतला आहे. पण जसा जसा वेळ जातो, तसा तसा सिनेमा अनेक वळणं घेतो. कलाकारांची अभिनय ही या सिनेमाची सर्वात जमेची बाजू आहे. राजकुमार रावने अप्रतिम अभिनय केला आहे. गे रोल साकारताना त्याने दिलेले इमोशनल सीन्स खिळवून ठेवतात. सुमीच्या भूमिकेत भूमी पेडणेकरही भाव खाऊन जाते. तिची पार्टनर चुम दरंगसोबतचे तिचे रोमॅन्टिक सीन्स तिने अगदी रिअल वाटावे इतक्या प्रभावीपणे वठवले आहे. चुम दरंग ही सुद्धा तिची छाप सोडते. गुलशन देवैय्या सेकंड हाफमध्ये येऊन सर्वांना धक्का देतो. सीमा पाहवा, लवलीन मिश्रा, नितेश पांडे यांनीही आपआपल्या भूमिकांमध्ये जीव ओतला आहे. चित्रपटाची गाणीही आनंद देणारी आहे. अर्थात चित्रपट क्लायमॅक्स आणखी चांगला होऊ शकला असता. मसाला सिनेमा देण्याच्या नादात अनेक ठिकाणी सिनेमा भरकतो.

समलैंगिक मुद्यावरचे अनेक सिनेमे आणि सीरिज तुम्ही पाहिले असतील. पण बधाई दो हा सिनेमा एका अर्थाने वेगळा ठरतो. चित्रपटाचा विषय संवेदशनशील असला तरी तो कधी हसवतो, कधी भावुक करतो. शिवाय सरतेशेवटी संदेशही देतो. तेव्हा तो एकदा पाहायला हरकत नाही.

 

टॅग्स :राजकुमार रावभूमी पेडणेकर बॉलिवूड